
भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर योगी मंत्रिमंडळात नव्या नावांचाही समावेश होणार आहे.
योगींच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 40 हून अधिक मंत्री घेणार शपथ
Uttar Pradesh Assembly Election : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये भाजपच्या विजयानंतर नवीन सरकारच्या स्थापनेत मुख्यमंत्र्यांसह 40 हून अधिक मंत्री शपथ घेऊ शकतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 21 किंवा 22 मार्च रोजी शपथविधी सोहळा होऊ शकतो, असं बोललं जातंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मंत्रिमंडळात 'जात' समतोल राखण्यासाठी 2 डझनहून अधिक विद्यमान मंत्र्यांसह नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचं धोरण आखलंय.
योगी सरकारच्या (Yogi Government) नव्या मंत्रिमंडळासंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पीएम मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महासचिव बीएल संतोष, यूपी निवडणूक प्रभारी यांची भेट घेतली. त्यानंतर ते सोमवारी लखनऊला परतले. परंतु, सीएम योगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि प्रदेश सरचिटणीस संघटनेचे सुनील बन्सल यांची येत्या काही दिवसांत पुन्हा भेट घेणार असल्याचं कळतंय. दरम्यान, अमित शहा, जेपी नड्डा, बीएल संतोष आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंत्र्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

Yogi Adityanath
हेही वाचा: 21-0 सौरभबाबा हिरो; निकालानंतर प्रतापगड कारखान्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष
योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री सुरेश खन्ना, कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही, आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह, औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना, ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा, एमएसएमई सिद्धार्थनाथ सिंह, जितिन प्रसाद, शहरी विकास मंत्री आशुतोष टंडन, अल्पसंख्याक कल्याण मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी, मागासवर्गीय कल्याण मंत्री अनिल राजभर, जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह, पंचायत राज मंत्री भूपेंद्र चौधरी यांना पुन्हा जागा मिळू शकते. मात्र, योगी-2 च्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री संदीप सिंह, बदलेव सिंह औलख, मोहसिन रझा आणि गुलाब देवी यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: 'गांधी परिवारानं काँग्रेसचं नेतृत्व सोडावं अन् दुसऱ्याला संधी द्यावी'
राज्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर योगी मंत्रिमंडळात नव्या नावांचाही समावेश होणार आहे. यात माजी आयुक्त आणि कन्नौजचे आमदार असीम अरुण, माजी राज्यपाल आणि आग्रा ग्रामीणच्या आमदार बेबीरानी मौर्य, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार अरविंद कुमार शर्मा, ईडीचे माजी सहसंचालक आणि सरोजिनी नगरचे आमदार राजेश्वर सिंह यांचा समावेश असल्याची अटकळ बांधली जात आहे. तसेच साहिबाबादमधून विक्रमी मतांनी विजयी झालेले सुनील शर्मा आणि नोएडामधून 1.80 लाखांहून अधिक मतांनी विक्रम करणारे पंकज सिंह यांनाही मंत्री केलं जाऊ शकतं.
Web Title: Up Election 40 Ministers Including Chief Minister Will Be Sworn In As Ministers In Yogi Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..