मकरंद अनासपुरेंची झाडीपट्टीत 'एंट्री'

दीपक अडकीने / अरविंद चुनारकर
शनिवार, 21 जानेवारी 2017

भिसी/ब्रह्मपुरी : मकरंद अनासपुरे मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव. विनोदी अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केले. मात्र, या मक्‍यादादाला झाडीपट्टीची भुरळ पडली आहे. त्यामुळे आता अनासपुरे यांचा अभिनय झाडीपट्टीच्या नाटकातून बघता येणार आहे.

भिसी/ब्रह्मपुरी : मकरंद अनासपुरे मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव. विनोदी अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केले. मात्र, या मक्‍यादादाला झाडीपट्टीची भुरळ पडली आहे. त्यामुळे आता अनासपुरे यांचा अभिनय झाडीपट्टीच्या नाटकातून बघता येणार आहे.

चिमूर तालुक्‍यातील भिसी येथे 'गद्दार' नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकातून भूमिका अनासपुरे यांनी झाडीपट्टी रंगभूमीत एंट्री केली. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज झाडीपट्टी नाटकांची राजधानी म्हणून ओळखली जाते. येथे मोठ्या संख्येने नाटक कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात हिवाळ्याच्या दिवसांत नाटकांचे आयोजन केले जाते. मुंबई, पुणे येथील कलावंतही या कंपन्यांशी करार करून नाटकात अभिनय करीत आहेत. मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा अभिनय झाडीपट्टीतील नाटकांतून बघायला मिळू लागला आहे.

महाराष्ट्र ललित रंगभूमी वडसा यांच्या माध्यमातून भिसी येथे गुरुवारी (ता. 19) गद्दार नाटकाचे प्रयोग झाले. या नाटकात नरेश गडेकर आणि त्यांच्या सहकारी कलाकारांसह मकरंद अनासपुरे अभिनय करणार असल्याने प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. भिसी येथील आनंद भीमटे यांनी गद्दार नाटकाचे लेखन केले. या नाटकात अनासपुरे यांची मुख्य भूमिका होती. 

नाटकाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, पोलिस निरीक्षक हेमंत खराबे, माजी राज्यमंत्री रमेश गजबे, डॉ. दिलीप शिवरकर, विजय घरत, पार्वताबाई गभने, गोपाल बलदुवा, वसंत वारजुरकर उपस्थित होते. यावेळी आमदार भांगडिया यांच्या हस्ते मकरंद अनासपुरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, या दौऱ्यात अनासपुरे यांच्या सोबतीला दिग्दर्शिका अरुंधती भालेराव होत्या. 

मकरंद अनासपुरे यांनी आपल्या नाटकातून झाडीपट्टीत प्रवेश करावा, ही आपल्यासाठी मोठी बाब आहे. अनासपुरे यांना झाडीपट्टीत आणण्याचे संपूर्ण श्रेय ज्येष्ठ कलावंत अरविंद झाडे यांना आहे. 
- आनंद भीमटे, नाट्य लेखक

Web Title: Makrand Anaspure to act in zadipatti rangbhumi