अतिरिक्त शुल्क आकारणे पडले महाग, सीबीएसई शाळांकडून होणार दोनशे कोटींची वसुली

मंगेश गोमासे
Monday, 26 October 2020

शहरातील नामवंत सीबीएसई शाळांमध्ये दरवर्षी १५ ते २० टक्के शुल्कवाढ करण्यात येते. याशिवाय शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती आणि विविध शुल्काद्वारे पालकांची लूट केली जाते.

नागपूर : शहरातील काही सीबीएसई शाळांनी पालकांकडून विविध प्रकारे जास्तीचे शुल्क आकारले. याबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार, या शाळांकडून जादा शुल्काची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे शहरातील काही शाळांकडून होणारी वसुली दोनशे कोटींच्या घरात आहे. 

हेही वाचा - बापरे! नागपुरात ‘चौकीदार चोर है’चा मुद्दा ऐरणीवर; एक घटना ठरली कारणीभूत

शहरातील नामवंत सीबीएसई शाळांमध्ये दरवर्षी १५ ते २० टक्के शुल्कवाढ करण्यात येते. याशिवाय शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती आणि विविध शुल्काद्वारे पालकांची लूट केली जाते. याविरोधात अनेकदा पालक संघटनांनी शिक्षणाधिकारी ते उपसंचालकांना वारंवार निवेदन सादर केले. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने पालकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन सादर करीत, तक्रारींचा निपटारा करण्याची मागणी केली होती. त्यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील बैठकीत काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पालकांच्या तक्रारी ऐकून घेत, त्याचे उत्तर थेट सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना विचारले होते. यावेळी सीबीएसई शाळांकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क, इतर छुपे शुल्क, बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेली पालक-शिक्षक समिती, टाळेबंदीच्या काळात पालकांना सातत्याने शुल्काच्या तगादा लावणे या मुद्द्यावर पालकांनी राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी ज्या शाळांनी पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेतले, त्यांच्याकडून एका महिन्यात शुल्काची वसुली करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यानुसार आज सेंट उर्सुला शाळेत पालकांना बोलावून घेत, त्यांच्याकडून सगळी माहिती घेण्यात आली. याशिवाय उपसंचालकांना या शाळांकडून शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. प्रसंगी न्यायालयीन लढा देऊ, असे बच्चू कडू म्हणाले. यावेळी विभागीय उपसंचालक अनिल पारधी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे उपस्थित होते. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका भोवली; नागपूरच्या युवकाला गुजरातच्या राजकोट येथून अटक

सीबीएसई शाळांकडून विविध शुल्कापोटी पैसे आकारण्यात येते. माझी मुलं नारायणा शाळेत असून त्यांच्या चिंचभवन शाखेकडून १२ कोटींची वसुली करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यापूर्वीच्या बैठकीत त्यांनी शुल्क वसूल करण्याचे आदेश दिले होते. याबाबत कागदपत्र जमा करण्यात आले आहेत. 
- डॉ. सोनाली भांडारकर, पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 crore will be recovered from cbse school in nagpur