
भंडारा येथे शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शहरातही शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांत अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही
नागपूर ः शहरातील विविध खाजगी तसेच शासकीय रुग्णालयातील रुग्णांचाही जीव धोक्यात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयासह अनेक मोठी खाजगी हॉस्पिटल धोकादायक इमारतीत असल्याचे अग्निशमन विभागाच्या अहवालात स्पष्ट आहे. एकीकडे शासकीय रुग्णालयांत सुविधांचा बोजवारा उडाला असतानाच रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळणारे खाजगी दवाखाने बेजबाबदारीने वागत असल्याचे चित्र आहे.
भंडारा येथे शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शहरातही शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांत अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ७५० इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले असून तेथून दूर निघून जाण्यासंबंधी नोटीस दिले आहे.
विशेष म्हणजे यात मेयो व आयुर्वेदिक कॉलेजमधील ४३ युनिटसह १४ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. अग्निशमन यंत्रणा नसल्याने या इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर शहरातील एकूण धोकादायक इमारतीची यादीच जाहीर करण्यात आली असून यात रुग्णालये, शिक्षण संस्था, रेस्टॉरेंट, बार, उद्योगासह रहिवासी इमारतींचाही समावेश आहे. एवढेच नव्हे अग्निशमन विभागाने ६० इमारतीतील पाणी बंद करण्याच्या सूचनाही मनपा जलप्रदाय विभाग व ओसीडब्लूला दिल्या आहेत. महावितरणलाही वीज जोडणी बंद करण्यासंबंधी पत्र दिले आहे.
अग्निशमन विभागाने १ हजार ८४४ इमारतीची पाहणी केली. यातील शहरातील ३१३ रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणेबाबत तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर अग्निशमन विभागाने सर्वांनाच अग्निशमन यंत्रणा लावण्याबाबत नोटीस बजावली. काहींनी अग्निशमन यंत्रणा उभारली. परंतु ज्या इमारतीत अग्निशम यंत्रणा नाही, अशा इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आल्याचे अग्निशमन विभागातील उच्चपदस्थ सुत्राने नमुद केले.
पाणी, वीज सुरूच
धोकादायक इमारती, रुग्णालयांचे पाणी बंद करण्यासंबंधी ओसीडब्लूला तर वीज बंद करण्यासंदर्भात महावितरणला अग्निशमन विभागाने पत्र दिले. परंतु या दोन्ही संस्थांकडून धोकादायक इमारतीत पाणी व वीजपुरवठा सुरू आहे.
सुविधांचा अभाव
अनेक इमारतींमध्ये महाराष्ट्र अग्नीसुरक्षा व नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे सुत्राने नमुद केले. अनेक इमारतीत आपातकालीन जिना, इमारतीच्या भोवती मोकळ्या जागेचा अभाव आहे. अनेक इमारती राष्ट्रीय इमारत नियमानुसार असल्याचेही समजते.
संपदान - अथर्व महांकाळ