
आत्तापर्यंत रस्त्यांची केवळ निम्मे कामे झाल्याने तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवी झाडे कधी लागणार? असा सूर उमटत असून पर्यावरणाबाबत प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर : शहरासह जिल्ह्यात १३८ किमी रस्त्यांची कामे सुरू असून यातील काही चार वर्षांपासून सुरू आहे. रखडलेल्या या रस्त्यांच्या कामात प्राणवायू देणाऱ्या विविध प्रजातींच्या ९ हजारांवर झाडांचा बळी गेला. आत्तापर्यंत रस्त्यांची केवळ निम्मे कामे झाल्याने तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवी झाडे कधी लागणार? असा सूर उमटत असून पर्यावरणाबाबत प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा - साखरेला येणार ‘अच्छे दिन’; खाद्य तेल, तांदूळ स्थिरावले
शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहराच्या एकूण ६१.५३५ किमीच्या आऊटर रिंग रोडचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अजूनही कामे अपूर्ण असून आत्तापर्यंत केवळ २२.६०० किमी चारपदरी रस्त्यांचे कामे पूर्ण झाले. परंतु, पूर्ण रस्त्यासाठी आतपर्यंत १२७६ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. राज्य सरकारने एका झाडांच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम केला आहे. आतापर्यंत एकही झाड लावले नसल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शहरात मानेवाडा ते कळमना रिंगरोड तसेच प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौकापर्यंत उड्डाणपुलाची कामे गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या सात किमीच्या कामापैकी केवळ २.१४ किमीचे काम पूर्ण झाले असून यात ५०४ झाडांचा बळी गेला. या मोबदल्यातही अजूनही झाडे लावण्यात आली नाहीत.
हेही वाचा - दूध बी पाजू नाई दिलं अन् मायी पोरगी उपाशीच मेली जी;...
शहरातील रिंगरोडच्या मध्यभागी दुभाजक तयार करण्यात आले आहे. तेथे झाडे लावण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु, अजूनही या दुभाजकांवर झाडे लागली नसून अनेक भागात झुडपं वाढली आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या २८.८८ किमी मार्गाचे रुंदीकरण मागील पंधरा महिन्यांपासून सुरू आहे. ४८० कोटींच्या या प्रकल्पात २ हजार ८८८ झाडे कापण्यात आली. या रस्त्यांचे १८ किमीचे काम पूर्ण झाले असून त्यावर नोव्हेंबर २०२० पर्यंत २५१ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ४१ किमीच्या उमरेड रोडचेही रुंदीकरण सुरू असून ४१८ कोटींच्या या प्रकल्पात पंधरा महिन्यांत २२ किमीचे काम झाले. अद्यापही निम्मे काम शिल्लक आहे. या रस्त्याच्या कामात सर्वाधिक ४ हजार ७३४ झाडे कापण्यात आली. शहर व ग्रामीणमध्ये २ हजार ५१६ कोटींचे एकूण १३८ किमीचे काम सुरू असून आत्तापर्यंत ६४ किमीचे काम झाले आहे. परंतु, अजूनही एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्यात आली नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पर्यावरणाबाबत गांभीर्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला
झाडांच्या प्रतीक्षेत वाढली झुडपं -
शहरात रिंगरोडच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवर झाडे लावण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम तसेच महापालिकेची आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून झाडे लावण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या दुभाजकांवर झाडांच्या प्रतीक्षेत आता झुडपं वाढली आहे.