Video : दिल्लीपाठोपाठ आता नागपुरातही चालणार झाडू, "आप' कार्यकर्ते जोमात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

दिल्ली हे विकासाचे मॉडेल म्हणून देशात पुढे येत आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचे वचन आप सरकारने दिले होते, ते पूर्ण केले. आज दिल्लीतील शाळांचा निकाल 96 टक्के आहे. देशातील अनेक राज्य विकासाचे मॉडेल म्हणून दिल्लीचे अनुकरण करीत आहे. महीला सुरक्षेसाठी शहरभर सीसी टीव्ही कॅमेरे, विजेच्या घरगुती ग्राहकांना 100 ते 200 युनिटपर्यंत मोफत विज देण्याबाबत आज अनेक राज्ये विचाराधिन आहेत.

नागपूर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झाडू दिल्लीवर चालला. त्यामुळे नागपुरातील "आप'च्या कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. आज येथील "आप'च्या कार्यालयासमोर दिल्लीतील विजयाचा जल्लोष करण्यात आला. दोन वर्षांनंतर होणारी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पार्टी संपूर्ण शक्तीनिशी लढविणार असून सत्ता हस्तगत करण्यासाठी आम्ही आजपासूनच कामाला लागलो असल्याचे "आप'चे पूर्व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे आणि राज्य कोषाध्यक्ष जगजितसिंग यांनी सांगितले. 

 

दिल्ली हे विकासाचे मॉडेल म्हणून देशात पुढे येत आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचे वचन आप सरकारने दिले होते, ते पूर्ण केले. आज दिल्लीतील शाळांचा निकाल 96 टक्के आहे. देशातील अनेक राज्य विकासाचे मॉडेल म्हणून दिल्लीचे अनुकरण करीत आहे. महिला सुरक्षेसाठी शहरभर सीसीटीव्ही, विजेच्या घरगुती ग्राहकांना 100 ते 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याबाबत अनेक राज्ये विचाराधीन आहेत. पहिल्यांदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. जे दिल्लीत घडले, ते नागपूर महानगरपालिकेतही आम्ही करू शकतो. सद्यस्थितीत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने शहराची अवस्था खराब करून ठेवली आहे. शहरात महापालिकेच्या 450 पेक्षा अधिक शाळा होत्या, त्यातील अर्ध्याअधिक बंद पाडल्या.

नागपुरात हायअलर्ट; संघ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था

150 दवाखाने आहेत, पण एकाही दवाखान्यात पुरेसे डॉक्‍टर नाहीत. सरकारी बसेस खासगी कंपन्यांना चालवायला दिल्यात, पण त्यातून अपेक्षीत उत्पन्न पालिकेला मिळत नाही. पाणी वाटपाचेही खासगीकरण करून ठेवले आहेत. त्यामुळे दर उन्हाळ्यात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतात. केवळ जाती-धर्माचे राजकारण करून लोकांना लढवणे, एवढेच काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. महापालिकेत सत्ता आणून आम्ही शहराची ही स्थिती निश्‍चितपणे बदलविणार असल्याचे देवेंद्र वानखडे म्हणाले. 

इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यांनादेखील जनतेने सत्तेतून खाली खेचले, हा इतिहास आहे. त्यामुळे भाजपचेही सरकार जाईल आणि आपचे सरकार येईल. विकास आणि केवळ विकासासाठी "आप' कटिबद्ध आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी आमच्याकडे दोन वर्षे  आहेत. एवढा वेळ आम्हाला पुरेसा असल्याचेही वानखडे म्हणाले. याकामी त्यांच्यासोबत जगजितसिंग, अमृत सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंघल, गिता कुहीकर, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, ऍड. राजेश भोयर यांच्यासह "आप'चे सर्व संयोजकांनी कंबर कसली असल्याचेही वानखडे म्हणाले. 

घरी कुणी नसले की जागाचा राक्षस, करायचा अल्पवयीन पुतणीशी संबंध
 

वेगळ्या विदर्भाला पाठिंबा
छोट्या राज्यांचा विकास झपाट्याने होऊ शकतो, हे छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी दाखवून दिले. विदर्भ वेगळा झाल्यास या राज्याचा विकासही झपाट्याने होईल. त्यामुळे आम्ही वेगळ्या विदर्भाला समर्थन करणार. विदर्भ राज्य समितीच्या आंदोलनांना आमचा वेळोवेळी पाठींबा राहणार असल्याचे देवेंद्र वानखडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aap workers confident about upcoming nagpur municipal elections