खासगी रुग्णालय, लॅबवाल्यांनो सावधान! तुमच्यावर गृहविभागाची करडी नजर

निलेश डोये
Sunday, 27 September 2020

अनेक खासगी रुग्णालय शासकीय नियमानुसार रुग्णसेवा करत आहेत. पण काही खासगी रुग्णालय, तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे पुढे आले आहे. तशा तक्रारीही लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांना प्राप्त होत आहेत.

नागपूर : कोरोनामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांकडून खासगी रुग्णालय अव्वाच्यासव्वा बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळेच आता गृह खाते खासगी रुग्णालय, लॅब तसेच प्लाझ्मा लॅबवर करडी नजर ठेवणार आहे. प्रसंगी स्टिंग ऑपरेशन करून सामान्य नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्यांवर करड कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले आहेत.

अनेक खासगी रुग्णालय शासकीय नियमानुसार रुग्णसेवा करत आहेत. पण काही खासगी रुग्णालय, तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे पुढे आले आहे. तशा तक्रारीही लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांना प्राप्त होत आहेत. अशा वेळी शासकीय नियमाची पायमल्ली करून अतिरिक्ति पैशाची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही. शहरातील अनेक खासगी रुग्णालय या महामारीमध्ये प्रशासनासोबत उत्तम काम करत असून अशा सामाजिक जाणिवेतून काम करणाऱ्या रुग्णालयाची नोंद गृह खात्याने घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -धक्कादायक! दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन? नागपूरच्या कंपनीची  ५२ किलो स्फोटके...

सोमवारपासून स्टिंग ऑपरेशन -
महानगरपालिका, पोलिस प्रशासन, अन्न व औषधी प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या वेगवेगळ्या चमू तयार केल्या जातील. त्याद्वारे शहरातील विविध खासगी रुग्णालय, लॅब व प्रयोगशाळांना आकस्मिक गुप्त भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

होम क्वॉरन्टाइन व्यक्ती बाहेर पडल्यास दंड -
शहरांमध्ये मृत्युदर एकीकडे वाढत असताना काही बेजबाबदार नागरिक होम क्वॉरन्टाइन असताना देखील बाहेर फिरत आहेत. स्वतःसोबत कुटुंब, समाजातील नागरिकांचा जीव देखील धोक्यात आणत आहे. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी आता होम क्वॉरंटाइनचा स्टॅम्प मारण्याचे देखील सुचित करण्यात आले. मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड आकरण्यात येत आहे. सोमवारपासून अधिक सक्तीने ही मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - आरोग्यपथके पोहोचली गाव, पाडे, तांडे, वस्त्यात...

टोल फ्री क्रमांक जाहीर -
पोलिस विभागाने टोल फ्री क्रमांक १०० आणि व्हॉट्सअ‌ॅप क्रमांक ९८२३३००१०० जाहीर केला आहे. सामान्य नागरिक दोन्ही क्रमांकावर अडवणूक केल्याची तक्रार नोंदवू शकतील. खासगी रुग्णालयाचे महानगरपालिकेमार्फत ऑडिट होत असून अशा पद्धतीची लूट होत असल्यास महानगर पालिकेच्या ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action will taken if private hospitals and lab take more fees says home minister anil deshmukh