चला, उठा गडयांनो, पुन्हा पेरूया हिरवी स्वप्ने!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या "मृग' नक्षत्राला उद्यापासून (ता. आठ) सुरुवात होत आहे.यंदाचे कृषी विभागाने केलेल्या नियोजनातून कुठे कापसाचे क्षेत्र तर काही तालुक्‍यांत सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता दिसून येत आहे.
 

नागपूर (ग्रामीण) : शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या "मृग' नक्षत्राला उद्यापासून (ता. आठ) सुरुवात होत आहे. यंदा पावसाची स्थिती उत्तम राहील, या आशेने शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे आटोपून घेतली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे अभावपूर्ण नियोजन, कापूस विक्रीची झालेली दुर्दशा आदी संकटातूनही शेतकरी नव्या हंगमाची सुरुवात उमेदीने करीत आहेत. यंदाचे कृषी विभागाने केलेल्या नियोजनातून कुठे कापसाचे क्षेत्र तर काही तालुक्‍यांत सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता दिसून येत आहे.

हेही वाचा : भयंकर ! पब्जीचा स्कोअर न झाल्याने नागपुरातील युवकाने घेतला गळफास

शेतकरी पेरणीसाठी सज्ज
उमरेड : गेल्या रब्बी हंगामातील कापसाचे पीक बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीअभावी पडून आहे. बाजार समितीत व शासनाच्या किचकट खरेदी प्रक्रियेमुळे हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरीच पडून असल्याने खरीप हंगामात लागणारे बी-बियाणे तसेच रासायनिक खते खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. शासनाने आमच्या कापसाची हमी भावात तातडीने खरेदी करून आमची आर्थिक अडचण दूर करावी, तेव्हाच आम्ही येऊ घातलेल्या खरीप हंगामात तग धरू शकू, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकरी करीत आहेत.

हे नक्‍कीच वाचा : कोरोनातून सावरलेल्या नागपूरच्या या व्यक्‍तीने केले "प्लाझमा' दान

उमरेड तालुक्‍यातील नियोजन
कापूस पिकासाठी एकूण 22 हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली असणार आहे आणि त्यासाठी 66 हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी असून 41 हजार 164 पाकिटे सध्या उपलब्ध आहेत. त्यानंतर दुसरे मुख्य पीक म्हणजे सोयाबीन. त्यासाठी एकूण 16 हजार हेक्‍टर शेतजमीन पेरणीसाठी नियोजित आहे. तालुक्‍यात 11 हजार 750 क्विंटल बियाण्यांची मागणी असून 6,300 क्विंटल बियाणे कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर तूर पिकासाठी तीन हजार हेक्‍टर शेतजमीन (बियाणे मागणी 300 क्विंटल तर 187 क्विंटल बियाणे उपलब्ध ), भात पिकासाठी दोन हजार हेक्‍टर शेतजमीन नियोजित असून, त्यासाठी लागणारे बियाणे 1000 क्विंटल मागणी तर 623 क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले. याशिवाय खरीप हंगामात लागणारी रासायनिक खते युरिया 5,100 मेट्रिक टन मागणी तर उपलब्धता 5,777 मेट्रिक टन, डीएपीची मागणी 1,025 मेट्रिक टन उपलब्धता ही 577 मेट्रिक टन याप्रमाणेच अन्य खतांचा पुरवठा असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : परीक्षा घेताय मग, एक कोटींचा विमा काढा

भिवापूर तालुक्‍यात पहिली पसंती सोयाबीनला
नांद : तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली आहे. खरिप हंगाम तोंडावर असून, मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीलासुद्धा सुरुवात करतील. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बी-बियाण्याची खरेदी सुरू केली आहे. दरम्यान, भिवापूर तालुक्‍यात यावर्षी 43,032 हजार हेक्‍टरमध्ये खरीप पेरणीचे नियोजन केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जारोंडे यांनी दिली. यावर्षी शेतकऱ्यांचा धान, सोयाबीन, हळद व कपाशी लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, कपाशी पिकांपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र हजार हेक्‍टरने वाढले आहे. त्यामुळे तालुक्‍यात यावर्षी सोयाबीनचे प्रथम क्रमांकाचे पीक ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advent of Mrig Nakshatra, taluka wise picnic planning of agriculture department announced