कपल नंतर सोशल मीडियावर आता ‘खाकी चॅलेंजची’ धूम; ‘माझी वर्दी-माझा अभिमान’; पोलिसांनी स्विकारले चॅलेंज

अनिल कांबळे 
Thursday, 24 September 2020

पोलिसांनी आता एफबीवर ‘खाकी चॅलेंज’ सुरू केले असून राज्यभरातील अनेक पोलिसांनी हे चॅलेंज स्विकारले असून एफबीवर कडक वर्दीतील फोटो शेअर करीत आहेत.

नागपूर : सध्या फेसबुकवर वेगवेगळ्या ‘चॅलेंज’चा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये कपल चॅलेंजला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. त्यातच आता कोरोना काळात पहिल्या फळीत लढणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उडी घेतली आहे. पोलिसांनी आता एफबीवर ‘खाकी चॅलेंज’ सुरू केले असून राज्यभरातील अनेक पोलिसांनी हे चॅलेंज स्विकारले असून एफबीवर कडक वर्दीतील फोटो शेअर करीत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून सोशल मिडियावर कपल चॅलेंज सुरू असून हजारो युजर्सनी फेसबुकवर पती-पत्नीसह रोमॅंटिक फोटो शेअर करीत चॅलेंज स्विकारत आहेत. काही महिला भारतीय संस्कृतीनुसार साडी, शालू, नऊवारीमध्ये तर पतींना कुर्ता पायजामा, धोतर-सदरा आणि वेडींग ड्रेसवरही फोटो शेअर केल्या जात आहे. 

आजारातून बरे झाल्यानंतर जाणवतोय अशक्तपणा? मग हे उपाय करा आणि अशक्तपणा कायमचा घालवा

सोशल मिडीयावर नेहमीच सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्युटीवर तत्पर असणारे पोलिस मनाने थकले आहेत. परंतु हिम्मत हारलेले नाहीत. राज्यातील जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर जवळपास १५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रत्येक जण सध्या आपापल्या कुटुंबाच्या सुरक्षसाठी झटत आहेत तर पोलिस सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावत आहे. 

पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी फेसबूकवर ‘खाकी चॅलेंज’चा ट्रेंड सुरू केला आहे. गेल्या चोविस तासाच या ट्रेंडला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा मागे नाहीत. अनेक महिला पोलिसांनी खाकीतील कडक वर्दीत रूबाबात फेसबुकवर फोटो शेअर करीत या अभियानात सहभाग घेतला आहे.

खाकी चॅलेंजची वेगळीच छाप

सध्या फेसबुकवर 'कपल चॅलेंज' असा ट्रेंड सुरु झाला आहे. यात प्रत्येक जण आपल्या फेसबुक पेजवरुन जोडीदाराचे (पती-पत्नी) फोटो शेअर करताना दिसू लागले आहे. या नवीन ट्रेंडने सर्वांच्या मनावर भुरळ घातली असून सगळीकडे (हॅशटॅग कपल चॅलेंज) दिसत आहे. कोणी लग्नातले फोटो शेअर करीत आहेत, काही जण पर्यटनाला गेल्यानंतर त्यावेळच्या आठवणींना उजाळा देणारा जोडीतील फोटो शेअर करीत आहेत. पोलिसांच्या खाकी चॅलेंजने मात्र एफबीवर वेगळीच छाप सोडली आहे. कर्माचाऱ्यांच्या या ट्रेंडचे वरिष्ठ पोलिस अधिकारीसुध्दा कौतूक करीत आहेत.

प्रचंड मेहनतीनंतर मिळाली खाकी 

आम्हाला मिळालेली वर्दी आमच्या आई वडिलांच्या मेहनतीनंतर आणि खडतर प्रशिक्षणानंतर मिळाली आहे. समाजाच्या रक्षणाचे व्रत जोपासण्यासाठी आम्ही जीव पणाला लावतो. जात-पात आणि रंगभेद विसरून आम्ही खाकी अंगावर चढविली आहे. त्यामुळे आमची खाकी आमचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मिडियावर पहायला मिळत आहे.

अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हिम्मत असेल तर गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करा

सिंगल्सपासून ‘मिंगल’ होण्यासाठी उत्सूक असलेल्या युवकांना मात्र हे चॅलेंज रूचले नाही. सिंगल्सला चिडविण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे आम्ही ‘सिंगल्स चॅलेंज’ सुरू केले आहे. ज्यांना गर्लफ्रेंड आहे त्यांनी हिम्मत असेल तर आपापल्या गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करावा, असे चॅलेंजसुद्धा जोडप्यांनी सिंगल्स असलेल्या युवकांना केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after couple challenge now Khaki challenge is trending on social media