सांस्कृतिक भवनात कोंडलाय आंबेडकरी विचारांचा श्वास; भवनाभोवती टिनांची संरक्षण भिंत

चंद्रशेखर महाजन
Saturday, 23 January 2021

सांस्कृतिक केंद्राचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, याकरिता पश्चिम नागपूर भोजनदान समितीने तत्कालीन महापौर अनिल सोले यांना निवेदन दिले होते. त्यांनी ५० लाखांची निधी मंजूर केला होता.

नागपूर : १९७६ पासून आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा जल्लोश ज्या सांस्कृतिक भवनाने साजरा केला. त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा श्वास कोंडायला लागला आहे. महानगरपालिकेने या भवनाभोवती टिनांची संरक्षण भिंत उभी केली आहे. अंबाझरीच्या १८ एकर परिसरातील सांस्कृतिक भवनाला गोडावून करून आंबेडकरी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जाण ठेवून नागपूर महानगरपालिकेने १९७६ मध्ये अंबाझरी उद्यानाजवळील १८.८६ एकर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली. यामुळे आंबेडकरी समाजात उत्साह निर्माण झाला. त्या काळात हे सभागृह आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनले होते. मात्र, गेल्या २० वर्षात पालिकेने याकडे लक्ष देणे बंद केले. देखभाल होत नसल्याने या सभागृहाची वाताहत झाली. खिडक्या, तावदाने तुटली. वीज गेली.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

मूलभूत सुविधा नसल्याने चळवळीतील लोकांनीही याकडे पाठ फिरविली. मात्र काही कार्यकर्त्यांनी भवनाच्या देखभालीसंदर्भात पालिकेला वारंवार अर्ज, विनंत्या केल्या. तरीही याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नसल्याने हे चळवळीचे केंद्र असामाजिक तत्त्वाचा अड्डा बनले आहे. काही महिन्यांपासून महानगरपालिकेनेच या भवनाला सिमेंटचे गोडावून बनविले आहे.

५० लाखांचा दिली निधी, खर्च केले ६ लाख

सांस्कृतिक केंद्राचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, याकरिता पश्चिम नागपूर भोजनदान समितीने तत्कालीन महापौर अनिल सोले यांना निवेदन दिले होते. त्यांनी ५० लाखांची निधी मंजूर केला होता. त्यावर फक्त ६ लाख १५ हजार १३६ रुपयांचा निधी खर्च करण्यात आला, अशी माहिती समितीचे सचिव सुधीर वासे यांनी दिली. 

आंबेडकर भवनाला टिनाने झाकले

अंबाझरीच्या परिसरात असलेल्या बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला सध्या तरी गोडावूनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा प्रकार दिसू नये म्हणून या भवनाला टिनाच्या संरक्षण भिंतीने झाकण्यात आले आहे, असा आरोप आहे. यात सिमेंट ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे.

जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

२००७पासून दिले १२ वेळा निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, याकरिता पश्चिम नागपूर भोजनदान समिती अंबाझरी या संस्थेने १२ वेळा निवेदन दिले. २००७ पासून ही संस्था यासंदर्भात पाठपुरावा करीत आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. या संस्थेने आज, शुक्रवारी महापौरांना निवेदन दिले. यावेळी धनराज डाहाट, मोरेश्वर वहाणे, मुकुंदराज खोब्रागडे, सुधीर वासे, नितीन गजभिये उपस्थित होते.

भवन सर्वांसाठी खुले करा
महानगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही. दरम्यान विविध उपक्रमांकरिता ही जमीन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे काही झाले नाही. पालिकेने हे भवन सर्वांसाठी खुले करावे ही आमची मागणी आहे.
- धनराज डाहाट,
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambazari Ambedkar Bhavan became Godavun