कोरोनाविरोधातील लढ्याला बळ, या तपासणी प्रकल्पाला उपराजधानीत सुरुवात 

anti-corona antibodies testing project beginning in nagpur
anti-corona antibodies testing project beginning in nagpur

नागपूर : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी स्थानिक प्रशासन विविध प्रयोग करीत आहे. त्यातच एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता किंवा नाही, हे तपासणाऱ्या तसेच कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज (प्रतिकारशक्ती) तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजनाच्या दिशेने संशोधनाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) पीएसएम विभागातर्फे सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मेयो, मेडिकल आणि एम्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याने बऱ्यापैकी यश येईल. नागपूर शहर, ग्रामीण, कोरोना हॉटस्पॉटसह इतर विविध ठिकाणांहून विशिष्ट संख्येत नागरिकांची निवड करण्यात येईल. नागपुरात व्यापक स्तरावर ही चाचणी करण्यात येणार असून, दोन हजार 400 जणांवर हा प्रयोग करण्यात येईल. 

विशेष असे की, यातील निष्कर्षातून एक आशादायी चित्र दिसेल असा विश्‍वास नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. या प्रकल्पातून सामूहिक रोगप्रतिकार शक्तीचा अंदाज येईल. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात जून महिन्यापासून अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याच तुलनेत मेडिकल, मेयो, एम्समधून यशस्वी उपचारातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विभागातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के व्यक्तींमध्ये एकही लक्षण आढळून येत नाही. तर विभागात दगावलेल्यांमध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाधितांना इतर आजारांसह कोरोनाची लागण कारणीभूत ठरली. 

400 जणांची तपासणी 


नागपूर शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित झाली काय, हे तपासण्याचा पथदर्शी प्रकल्प असून, या प्रकल्पासाठी नागपूर महापालिका, जिल्हा परिषद, मेडिकल, मेयो, एम्ससह इतरही काही शासकीय व संस्थांची मदत मिळत आहे. शहर-ग्रामीण भागातील कोरोना हॉटस्पॉट, कोरोनाशी संबंधित यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या भागासह इतर सर्वच ठिकाणच्या सामान्य नागरिकांचे समप्रमाणातील संख्येत रक्त नमुने घेतले जातील. एकूण 2,400 जणांची तपासणी करण्यात येईल. कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती तपासली जाईल. प्रथम घेतलेल्या नमुन्यांची संख्या कमी आहे. अचूक अंदाज प्रशासनाला येणार नाही. मात्र, प्रतिकारशक्ती विकसित होण्यास सुरुवात झाली की नाही, याचा अंदाज येईल, असे डॉ. संजीव कुमार म्हणाले. या प्रकल्पासाठी मेडिकलच्या रोगप्रतिबंधकशास्त्र विभागासह (पीएसएम) इतरही विभागांनी सर्वेक्षण सुरू केले. पहिल्या टप्प्यात 400 जणांची तपासणी झाली. काही नागरिकांमध्ये ऍन्टीबॉडीज विकसित झाल्याचे पुढे आले आहे. 

 
10 हजार किट खरेदी
नागपूर जिल्ह्यात सुमारे 15 हजार रॅपिड अँटीजन तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी 5 हजार किटचा पुरवठा राज्य शासनाने केला आहे. प्रशासनाने 10 हजार किट खरेदी केल्या आहेत. याशिवाय विभागातील पाच जिल्ह्यांना प्रत्येकी 5 हजार किट खरेदी करण्याची सूचना केली आहे. या किटद्वारे कोरोनाची चाचणी अवघ्या 20 ते 30 मिनिटांत होते. हॉटस्पॉटसारख्या वस्तीमध्ये जाऊन थेट चाचणी करण्यास ही किट उपयोगी ठरते. 
-डॉ. संजीव कुमार, विभागीय आयुक्त, नागपूर 


संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com