अंत्योदय योजनेच्या धान्य वाटपात घोटाळा, दोन वर्षांपासून लाभार्थी धान्यापासून वंचित

विजयकुमार राऊत
Wednesday, 28 October 2020

अत्यल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून शासन दर महिन्याला प्रती दोन व तीन रुपये किलो दराने २० किलो गहू व १५ किलो तांदुळ पुरविते. कोणीही गरीब अन्नावाचून राहु नये, हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, तास येथील महिला बचत गटाकडून शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.

भिवापूर (जि. नागपूर): भिवापूर तालुक्यातील तास येथे अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून मिळणारे धान्य लाभार्थ्यांना न देता रेशन दुकानचालक ते इतरत्र विकत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. विशेष म्हणजे हे दुकान गावातीलच महिला बचत गटाकडून चालविले जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा - दिवसा वनभ्रमंती, रात्रीला मचाणावर जागरण; तेव्हा कुठं पिंजऱ्यात अडकला वाघोबा

अत्यल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून शासन दर महिन्याला प्रती दोन व तीन रुपये किलो दराने २० किलो गहू व १५ किलो तांदुळ पुरविते. कोणीही गरीब अन्नावाचून राहु नये, हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, तास येथील महिला बचत गटाकडून शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. गरीब, अशिक्षित कुटुंबांच्या अज्ञानाचा फायदा उचलून अंत्योदय योजनेद्वारे मिळणाऱ्या ३५ किलो धान्यापैकी केवळ पाचच किलो धान्य काही कुटुंबाना दिले जात आहे. उरलेले ३० किलो धान्य इतरत्र विकून दुकानचालक मालामाल होत आहेत. पीसाबाई अमृत मोटघरे, मालन सुदाम पाटील, देवकाबाई अर्जुन श्रीरामे  या ग्रामस्थांचे नाव अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट आहेत. मात्र, त्यांना प्रत्येक महिन्याला ३५ ऐवजी केवळ ५ किलो धान्य देण्यात येते. त्यांच्या शिधापत्रिकेतही ५ किलो धान्याची उचल केल्याची नोंद दुकानचालकांकडून करण्यात येते. थम्ब मशीनमधून निघणाऱ्या पावत्या ( बील ) मात्र त्यांना दिल्या जात नाही. हा प्रकार मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. 

हेही वाचा - दुबार पेरणी करूनही सोयाबीन सडलंय, आता चण्याचीही तीच स्थिती; आम्ही जगायचं कसं?

असा झाला भंडाफोड -
तासचे माजी सरपंच युवराज शंभरकर यांना संशय आल्याने त्यांनी इंटरनेटवर गावातील काही गरीब कुटुंबांच्या ई पासेसची तपासणी केली. तेव्हा अंत्योदय योजनेत सुरू असलेला वरील 
गैरप्रकार समोर आला. 

चौकशी व कारवाईची मागणी -
तास येथे एकूण ११४ लाभार्थ्यांचे नाव अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. त्यापैकी तीन लाभार्थ्यांना योजनेचे पूर्ण धान्य दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या मोठी असण्याची शक्यता असून त्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच युवराज शंभरकर यांनी केली आहे. मागणीचे निवेदन शंभरकर यांनी सोमवारी आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antyodaya anna yojana scam in tas village of bhiwapur nagpur