भविष्यात तुमच्या घरात नळाद्वारे येईल सिवेजचे पाणी; कारण, कंत्राटदाराच्या कामाकडे मनपाचे दुर्लक्ष

राजेश प्रायकर
Saturday, 6 March 2021

भविष्यात जलवाहिनीला गळती लागली तर सिवेजचे सांडपाणी हजारो घरांमध्ये नळाच्या माध्यमातून पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिवेजचे चेंबर तयार करताना जलवाहिनी उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदार तसेच महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, कंत्राटदार कंपन्यांकडून नागरिकांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधांना सुरुंग लावणे सुरू असल्याचे प्रेमनगर परिसरातील घटनेने पुढे आले. सिमेंट रस्ते बांधकामादरम्यान सिवेज लाईनचे चेंबर तयार करण्यात आले. विशेष म्हणजे नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरच हे सिवेज लाईनचे चेंबर बांधण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात जलवाहिनीला गळती लागल्यास नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्याची समस्या पोहोचणार आहे.

शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरविण्यात येत आहे. यानिमित्त होणारे खोदकाम, रस्ते पूर्ण होऊनही आयब्लॉक न लावल्याने नागरिकांत संताप आहे. अनेकदा या कामासाठी जलवाहिनीला तोडण्यात आले. अनेक ठिकाणी सिवेज लाईनलाही नुकसान पोहोचविण्यात आले. परंतु, सिमेंट रस्ते कंत्राटदार ही दुरुस्ती करून देत असल्याने काही काळ नागरिकांंना कळ सोसावी लागत आहे.

अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली

परंतु, जलवाहिनीवरच सांडपाणी वाहून नेणाऱ्या सिवेज लाईनचे चेंबर तयार करून कंत्राटदाराने निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचे चित्र आहे. प्रभाग २१ मध्ये दलाल चौक, राऊत चौक, कुंभारपुरा चौक, दही बाजार, प्रेमनगर येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. दलालपुरा चौकात सिवेज लाईनला क्रॉस करणारी जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या बाजूला करण्याची गरज होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करताना सिवेज लाईनच्या चेंबरमधून जाणारी जलवाहिनी तशीच कायम ठेवण्यात आली.

भविष्यात जलवाहिनीला गळती लागली तर सिवेजचे सांडपाणी हजारो घरांमध्ये नळाच्या माध्यमातून पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिवेजचे चेंबर तयार करताना जलवाहिनी उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदार तसेच महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना

नागरिकांचा संताप

प्रभाग २१ मधील दलाल चौक, राऊत चौक, कुंभारपुरा चौक, दही बाजार, प्रेमनगर, लालगंज येथील नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. महापालिका सुविधा तयार करीत आहे की शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत आहे, असा सवाल गुणवंत झाडे यांनी उपस्थित केला. लालगंज सुधार संघर्ष समितीनेही याबाबत सतरंजीपुरा झोन कार्यालयाला निवेदन देऊन जलवाहिनी सिवेज चेंबरपासून दूर करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aqueduct from the chamber of sewage line in Nagpur