प्रेमाच्या त्रिकोणातून युवकावर प्राणघातक हल्ला

अनिल कांबळे
Thursday, 12 November 2020

प्रेमभंगानंतर रोहित हा तणावात होता. शंकरला त्याचे दु:ख बघवले नाही. रात्री तो एकटाच मांगपुरा येथे सतीशला भेटायला गेला. त्याला समजावू लागला, की त्याने मुलीचा नाद सोडून द्यावा. त्याच्यामुळे मुलीने रोहितला सोडले आहे, अशी विनंती केली.

नागपूर : प्रेमीयुगुलामध्ये खटके उडाल्यानंतर युवतीने दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याही युवकाशी काही कारणास्तव वाद झाला. ती पुन्हा पहिल्या प्रियकराशी प्रेम करायला लागली. मात्र, दुसऱ्या प्रियकराला दोघांचाही राग आल्याने त्याना धडा शिकविण्याचा चंग बांधला. तो मित्राला घेऊन तिच्या पहिल्या प्रियकराला भेटायला गेला. दोघांत वाद झाला. एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश ऊर्फ लल्ला वडे (रा. मांगपुरा, राहतेकर वाडी, दसरा रोड) असे आरोपीचे नाव आहे. शंकर देवगडे (वय २०, रा. शिवनगर, सिंधी कॉलनी, खामला) असे जखमीचे नाव आहे.

सविस्तर वाचा - युवतीला भलताच प्रश्‍न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी केली अटक; मनधरणी करण्याचा आटापिटा

त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. एका मुलीचे प्रेमसंबंध सतीशसोबत होते. दोन वर्षांपूर्वी तिने सतीशला सोडून शंकरचा मित्र रोहित समुद्रे (वय २१, रा. सिंधी कॉलनी, खामला) याला पकडले. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

पण, बुधवारी रोहित व तरुणीत वाद झाला. या वादानंतर तिने रोहित सोबतचे संबंध तोडले. रोहितने ही बाब आपला मित्र शंकरला सांगितली. त्यांना वाटत होते की तरुणी पुन्हा सतीशकडे परत गेली असेल.

प्रेमभंगानंतर रोहित हा तणावात होता. शंकरला त्याचे दु:ख बघवले नाही. रात्री तो एकटाच मांगपुरा येथे सतीशला भेटायला गेला. त्याला समजावू लागला, की त्याने मुलीचा नाद सोडून द्यावा. त्याच्यामुळे मुलीने रोहितला सोडले आहे, अशी विनंती केली.

अधिक माहितीसाठी - ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

यादरम्यान त्यांच्यात वाद झाला व सतीशने चाकूने शंकरच्या पोटात वार केला. यात शंकर जखमी झाला व सतीश हा पळून गेला. शंकरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे पोलिसांनी रोहितच्या तक्रारीवर सतीशविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याअंतर्गत बुधवारी रात्री ११.३० वाजता मांगपुरा परिसरात घडली. जखमीवर उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault on a teenager from a love triangle