नागपुरात जेईई अ‌ॅडव्हान्समध्ये अथर्व डबली प्रथम, दिव्यांग गटातून गौरीकांत मुडके देशात १० वा

मंगेश गोमासे
Tuesday, 6 October 2020

सोमवारी परीक्षेच्या निकालाची घोषणा करण्यात आली. यात पहिल्या तिन्ही स्थानावर एलनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावर आदित्य कडू याने देशात ११२ वा क्रमांक, तर १२१ ऑल इंडिया रँकसह अरज खंडेलवाल याने शहरातून तिसरा क्रमांक पटकावला.

नागपूर : आयआयटी प्रवेशासाठी दिल्ली आयआयटीतर्फे २७ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ५) घोषित करण्यात आला. निकालात एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या अथर्व डबली याने १०१ वी ऑल इंडिया रँक मिळवून शहरातून प्रथम स्थान पटकावले. आयआयटी होमच्या दिव्यांग गटात गौरीकांत मुडके याने देशात १० वा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय अनुसूचित जमातीतून चैतन्य धानोरकरने देशातून ११६ वा क्रमांक प्राप्त केला आहे. 

देशातील २३ आयआयटीमध्ये ११ हजार २८९ जागा आहेत. यासाठी देशभरात २२२ शहरात जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. यात १लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जेईई मेन्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षाही घेण्यास उशीर झाला. या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या मनात बराच संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सोशल डिस्टन्सिंग चे पालन करीत जेईई मेन्स आणि २७ सप्टेंबरला जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षा पार पडल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. 

हेेही वाचा - नागपूर पोलिसांनी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यातील वरुणचा फोटो का केला ट्विट?

सोमवारी परीक्षेच्या निकालाची घोषणा करण्यात आली. यात पहिल्या तिन्ही स्थानावर एलनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावर आदित्य कडू याने देशात ११२ वा क्रमांक, तर १२१ ऑल इंडिया रँकसह अरज खंडेलवाल याने शहरातून तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे एलनची ही शहरातील पहिलीच बॅच असून त्यांनी निकालात चांगले यश मिळविल्याचे नागपूर संचालक आशुतोष हिसारीया यांनी सांगितले. संस्थेचे ४०० पैकी 80 विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरले असल्याचे ते म्हणाले. आयआयटी होमच्या श्रेयस वानखेडे याने अनुसूचित जातीतून २२७ वी ऑल इंडिया रँक, तर अर्नव मुळे याने इतर मागासवर्गीयातून ६८८ वी ऑल इंडिया रँक मिळविली आहे. दरम्यान शहरातून विविध संस्थेचे जवळपास ३०० हून अधिक विद्यार्थी यावेळी आयआयटी साठी पात्र ठरल्याचे समजते. 

हेेही वाचा - थकलेले भाडे द्या मगच हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करा; मालकाच्या मागणीने व्यावसायिक अडचणीत

आयआयटी दिल्लीत प्रवेश घेणार : अथर्व डबली 
जेईई अ‌ॅडव्हान्समध्ये शहरातून प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या अथर्वला आयआयटी दिल्लीमध्ये कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे. यानंतर संशोधनावर लक्ष्य केंद्रित करून आत्मनिर्भर भारत अभियानाला साथ द्यायची असल्याचे त्याने सांगितले. नियमित अभ्यास केल्याने आणि एलनमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याचे तो म्हणाले. 

आयआयटी होमचे १५० विद्यार्थी पात्र - 
जेईई अ‌ॅडव्हान्स परीक्षेचा सोमवारी (ता. ५) घोषित करण्यात आलेल्या निकालात आयआयटी होमच्या ४७५ विद्यार्थ्यांपैकी १५० विद्यार्थी पात्र ठरले आहे. यावर्षी यात १२४ विद्यार्थी सर्वसाधारण गटातील तर २६ विद्यार्थी मागास प्रवर्गातील आहेत. यात केदार देसाई १११५, रमाकांत तळणकर २०७८, मृण्मयी अगैतकर २८०७, पुष्कर लांजेवार २८४९, अर्नव मुळेने ४२६९ ऑल इंडिया रॅंक मिळविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atharva dabali got first rank in jee advance in nagpur