थकलेले भाडे द्या मगच हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करा; मालकाच्या मागणीने व्यावसायिक अडचणीत

राजेश रामपूरकर
Tuesday, 6 October 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावही वाढतो आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे ग्राहकांनी पहिल्या दिवशी पाठ फिरवल्याची शक्यता व्यक्त केली. १७ तारखेपासून नवरात्र सुरू होत असल्याने हॉटेल्समधील ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता कमीच आहे, असे हॉटेल व्यावसायिक गुड्डू तिवारी यांनी सांगितले.

नागपूर : तब्बल साडेसहा महिन्याची टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात उपाहारगृहे व मद्यालये सुरू झालेत. मात्र, पहिल्या दिवशी ग्राहकांनी हॉटेल, रेस्टॉरंटकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

दोन हजार हॉटेल आणि रेस्टारंटपैकी ७० टक्केच कालपासून सुरू झालेले आहेत. ५० टक्के उपाहारगृहे आणि, मद्यालये भाड्याच्या जागेत सुरू आहेत. टाळेबंदीतील सहा महिने बहुतांश व्यावसायिकांचे जागेचे भाडे थकले आहे. आस्थापना पुन्हा सुरू करण्यापूर्वी थकलेल्या भाड्यावरून बहुतांश व्यावसायिकांचे जागा मालकांशी वाटाघाटी सुरू असल्याचीही माहिती पुढे आलेली आहे.

जाणून घ्या - नोकराला चाळीस हजार रुपये पगार देणाऱ्या ‘बावाजीला’ अटक; गुन्हे शाखेच्या कारवाईवर संशय

एका हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, मद्यप्राशन करणारे ग्राहक पूर्वी बायकोच्या भीतीने अथवा मित्रांसोबत रेस्टॉरंट अथवा हॉटेलमध्ये येत असत. आता ग्राहकांनी घरीच मद्यप्राशन करणे सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावही वाढतो आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे ग्राहकांनी पहिल्या दिवशी पाठ फिरवल्याची शक्यता व्यक्त केली. १७ तारखेपासून नवरात्र सुरू होत असल्याने हॉटेल्समधील ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता कमीच आहे, असे हॉटेल व्यावसायिक गुड्डू तिवारी यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

हॉटेल किंवा मद्यालये सुरू करण्यापूर्वी काही जागा मालकांनी व्यावसायिकांकडे थकलेले भाडे मागितले. त्यामुळे अशा व्यावसायिकांना इच्छा असूनही उपाहारगृहे किंवा मद्यालये सुरू करणे शक्य नाही. हा व्यवसाय नव्याने उभा करावा लागेल. सर्वप्रथम ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागेल, अशी प्रतिक्रियाही एका व्यावसायिकांनी व्यक्त केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the first day customers not come to hotels and restaurants