केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम, बाळासाहेब थोरातांची सणसणीत टीका

balasaheb thorat criticized central government on farmers agitation in nagpur
balasaheb thorat criticized central government on farmers agitation in nagpur

नागपूर : गेल्या ५२ दिवसांपासून राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ५२ दिवस आंदोलन करणे सोपे नाही. केंद्र सरकारने हे काळे कृषी कायदे रद्द करावी, इतकीच शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार भांडवलदारांचे गुलाम झाले आहे आणि आता शेतकऱ्यांना गुलाम करायला निघाले आहेत. कोट्यवधींचे मालक शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार आहेत, अशी सणसणीत टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. आज नागपुरात काँग्रेसने मोर्चा काढता राजभवानाला घेराव घातला. यावेळी ते बोलत होते.

आज निघालेला मोर्चा मुंबई येथे नियोजित होता. पण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी नागपुरात असल्यामुळे आज राजभवनाला घेराव करण्यात आला. शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी रातोरात कार्यकर्त्यांनी मोर्चाची तयारी केली. आजच्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे आमदार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. काळ्या कृषी कायद्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने युवक आणि व्यावसायिक तर गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने गृहिणी अडचणीत आल्या आहेत. तरीही केंद्र सरकारला जाग येत नसल्यामुळे आज देशभरात काँग्रेसने राजभवनाला घेराव टाकण्याचे आंदोलन केले आहे. 

नागपुरात राजभवनासमोर एकाच ठिकाणी नव्हे तर काटोल नाका चौक, छावणी मार्गासह चारही बाजूंनी काँग्रेसचे कार्यकर्ते आले आणि घेराव केला. जेथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे, तेथे आज सकाळपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजभवनासमोरून होणारी वाहतूक काटोल नाका चौकातून वळवण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महागाईने होरपळलेली जनता, काळ्या कृषी कायद्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी आणि सिलिंडरच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com