नागपुरात यंदाची दिवाळी ‘खामोश'! मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी

Ban on fire crackers in nagpur this diwali
Ban on fire crackers in nagpur this diwali

नागपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी लावली. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज याबाबत आदेश काढले. नागरिकांनी शक्यतो इतर लहान फटाकेही फोडण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सध्या शहरात कोविडचा प्रादुर्भाव कमी असला तरी प्रत्येकाने सजग राहण्याची गरज व्यक्त करीत आयुक्तांनी आज दिवाळीनिमित्त फटाक्यांबाबत आदेश जारी केले. दिवाळी साजरी करताना कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे त्यांनी आदेशात नमूद केले. दिवाळीत फटाके न फोडण्याचेही आवाहन करीत आयुक्तांनी कोविड बाधितांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मोठ्या आवाजाची सुतळी बॉम्ब व इतर फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. 

महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व रुग्णालये, उद्याने, वृद्धाश्रम, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजाराची ठिकाणे, शासकीय तथा निमशासकीय कार्यालये यासह मनपाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये कोणत्याही प्रकारची फटाके फोडता येणार नाही, असेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते, त्यामुळे जनसामान्यांसह प्राणिमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पुढे दिसून येतो. वायू प्रदूषणामुळे कोरोनाबाधितांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

फटाके, दिवे लावताना सॅनिटायजर टाळा

कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर दिवाळीमध्ये धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. सॅनिटाजर ज्वलनशील असल्याने फटाके फोडताना आणि दिवे लावताना त्याचा वापर कुणीही करू नये. हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा हँडवॉशचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

दिवाळी पहाट, दिवाळी मीलन कार्यक्रमावरही बंदी

दिवाळीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामुदायिक कार्यक्रमांवर बंदी लावण्यात आली. त्यामुळे दिवाळी पहाट, दिवाळी मीलनसारखे कार्यक्रम सामुदायिकरित्या साजरे करता येणार नाही. हे कार्यक्रम ऑनलाइनरित्या आयोजित करावे, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. दिवाळीनिमित्त खरेदी करताना गर्दीची ठिकाणे टाळा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लग्न समारंभात बँड पथकाला परवानगी

लग्न समारंभात बँड पथकासाठीही निर्देश जारी करण्यात आले आहेत. बँड पथकामध्ये जास्तीत जास्त २० व्यक्तींचा समावेश करता येणार आहे. लग्न समारंभात ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली असून यामध्ये बँड पथकातील सदस्यांची संख्या गृहीत धरण्यात येईल. सामाजिक अंतर राखून बँड वाजविणे बंधनकारक राहील. सायंकाळी ९ वाजतापर्यंतच बँड वाजविण्याची मुभा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com