
नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील बाजारातील झाडांखाली कावळे मृतावस्थेत सापडली, तर कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपट, चिमण्या, कावळे, जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठ्या संख्येने अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले
नागपूर : बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही काही ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू झाला असून सोमवारला कळमेश्वर भागातील एक पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान, मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून दोन-तीन अहवाल येण्याचा अंदाज आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संसर्ग असलेल्या राज्यातील कोंबड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली.
हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...
जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील बाजारातील झाडांखाली कावळे मृतावस्थेत सापडली, तर कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपट, चिमण्या, कावळे, जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठ्या संख्येने अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले. रिंगणाबोडी बोडी येथे झाडाखाली मृत पोपटांचा सडा पडलेला आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पक्ष्यांचा मृत्यू कशाने झाला, याबाबत चर्चांना उधाण आली आहे, तर कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील २५० वर कोंबड्या मृत आढळल्या. कोंबड्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने बर्ड फ्लूची शक्यता नसल्याचा अंदाज विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मृत कोंबड्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी युवराज केने यांनी सांगितले.