भन्ते सदानंद महास्थवीर यांचे निर्वाण; उद्या होणार अंत्यसंस्कार 

केवल जीवनतारे
Tuesday, 4 August 2020

भन्ते सदानंद मागील साठ वर्षांपासून अंगावर चिवर धारण करून भारतासह जगातील विविध देशात बौध्द धम्माच्या प्रसार व प्रचार कार्यात मोलाची भूमिका वठवित आहेत. बौद्ध भिक्खूंसाठी सेमीनरी (प्रशिक्षण केंद्र) उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. काही प्रमाणात त्यांना हे स्वप्न पुर्ण करण्यात यश आले.

नागपूर : आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भंते सदानंद महास्थवीर यांचे मंगळवारी (ता.४) दुपारी ३ वाजता निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मानकापूर येथील कुणाल हॉस्पिटल, अॅलेक्सीस हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. बुधवारी (ता.५) वर्धा मार्गावरील केळझर येथील धम्मरजिक बुद्धविहार परिसरात सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सध्या कामठी मार्गावरील संघर्षनगर येथील संघाराम बुध्द विहारात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. 

भन्ते सदानंद मागील साठ वर्षांपासून अंगावर चिवर धारण करून भारतासह जगातील विविध देशात बौध्द धम्माच्या प्रसार व प्रचार कार्यात मोलाची भूमिका वठवित आहेत. बौद्ध भिक्खूंसाठी सेमीनरी (प्रशिक्षण केंद्र) उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. काही प्रमाणात त्यांना हे स्वप्न पुर्ण करण्यात यश आले. विशेष असे की, सिध्दहस्त लेखक म्हणून भन्ते सदानंद यांनी धम्म या विषयावर लेखन केले आहे. ७ नोव्हेंबर, १९३९ साली भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यात असलेल्या ईटगाव येथील गणवीर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून आई वडीलांसोबत ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. 

आईवडीलांनी त्यांचे लग्न करून दिले. मात्र, त्यांचे बुद्ध संस्कार पेरण्यासाठी आपण पुढे यावे ही प्रेरणा मिळाल्याने संसारात ते रमले नाही. एक दिवशी दळण आणण्यासाठी पीठगिरणीवर पवनी येथे आले. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. त्यांनी थेट बुध्दगया गाठले. १९६३ मध्ये त्यांनी अंगावर चिवर परीधान केले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी धम्म प्रसाराचे काम सुरू आहे. बुद्ध तत्त्वज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. वर्धा मार्गावरील केळझर बुध्दविहार ही त्यांची कर्मभूमी आहे. अनेक वर्षे ते येथील विहारात त्यांनी धम्मदेसना दिली. गेल्या काही वर्षापासून ते नागपुरात आले. कामठी मार्गावरील संघर्षनगर येथील संघाराम बुध्द विहारात त्यांचे वास्तव होते. 

अधिक माहितीसाठी - तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...
 

गेल्या अनेक वर्षांपासून अ. भा. भिक्खू संघाचे ते संघानुशासक म्हणून कार्यरत आहेत. भदंत सदानंद ज्येष्ठ भिक्षू आहेत. भदन्त दलाई लामा, भदंत आनंद कौसल्यायन, भदंत डॉ. जगदीश कश्यप, महापंडित राहुल सांकृत्यायन, भदंत मेटिवल संघरत्न, भदंत डी. शासनश्री यांचा समृद्ध वारसा भन्ते सदानंद यांना लाभला आहे. बुध्द महासुत्तासह अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. अनेक पुस्तकांचे त्यांनी अनुवादही केले. एका बैठकीत ते अख्खी पुस्तक लिहून काढायचे. १९६५ पासून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह अवघ्या देशातील अनेक गावांमध्ये बुध्द धम्माचा प्रचार व प्रसार केला. 

जपान, थायलंड, इंडोनेशीया, इंग्लंडसह ब्रम्हदेश, थायलंड, भूतानसह देश विदेशात त्यांनी धम्मप्रसार व प्रचार केला. भदंत सदानंद महाथेरो हे जनतेचे मित्र, सेवक आणि मार्गदर्शक म्हणून बौद्ध जगाला परिचित आहेत. आपल्या धम्म प्रचार, प्रसार कार्यात त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन तसेच महान बौद्ध साहित्याचा पाली भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करून एक ऐतिहासिक कार्य केले. भन्ते यांनी एकूण १८ ग्रंथांचे लेखन केले.

बुद्धगया मुक्ती, अनागारिक धर्मपाल, बुद्धाचे धम्मदूत आणि बौद्ध संस्कार पाठावली ही त्यातील काही उल्लेखनीय पुस्तके होत. १९६६ मध्ये वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे विहारभूमीसाठी आमरण उपोषण करून धम्मराजिक महाविहार निर्मिती करून भारतीय बौद्ध सेवा संघ ही संस्था स्थापन केली. १९८१ ला पाली विनय मुखोद्गत केल्याबद्दल बंगालमधील बिनागुंडी येथे त्यांना सद्धम्मादित्य उपाधीने विभूषित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने देशातील बौद्ध समाजाची मोठी हानी झाली आहे. 

ती आठवण.... 

वंदनीय भन्ते सदानंद महास्थविर यांच्या परिनिब्बाना (निधन) झाल्याचे वृत्त मनाला हलवून गेले. १ मे २०२० ला 'कोरोना' चा सर्वत्र कहर सुरू असताना लॉकडाउनच्या काळात दुपारी १ वाजता आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत कवी, इ.मो.नारनवरे यांच्या घरी पोहचले. भन्ते सदानंद यांनी लिहिलेल्या स्वचरित्राचे हस्तलिखित त्यांना इमो सरांकडून तपासून घेतले. ही संधी मिळाल्याची भावना कवी नारनवरे यांनी व्यक्त केली. भन्ते सदानंद यांच्या निर्वाणामुळे त्यांचे चरित्र प्रकाशित होऊ शकले नाही. ही जबाबदारी भिख्खू संघाने घ्यावी. समाज मदत करेल. अशी शोकसंवेदना त्यांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhante Sadanand Mahasthaveer passed away