हिंगण्यात भाजपला "मेगा'भरतीचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

भाजपमध्ये "मेगा' भरतीत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून रणकंदन माजले. याचा जबरदस्त फटका भाजपला निवडणुकीत बसला. दोन जिल्हा परिषद क्षेत्र गमवावे लागले. पंचायत समितीच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले.

हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने तालुक्‍यात "मेगा'भरती केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी इतर पक्षांतून भाजपमध्ये "मेगा' भरतीत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून रणकंदन माजले. याचा जबरदस्त फटका भाजपला निवडणुकीत बसला. दोन जिल्हा परिषद क्षेत्र गमवावे लागले. पंचायत समितीच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. 

तिकीट वाटपातील रणकंदन भोवले 

क्‍लिक करा  : नागपूर जिल्हा परिषद  : 21 व्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळयात? 

हिंगणा विधानसभा क्षेत्रात मोठी मुसंडी मारत आमदारपदी भाजपच्या समीर मेघे यांची वर्णी लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी माजी आमदार विजय घोडमारे यांना मैदानात उतरवले. मात्र घोडमारे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये "कलगीतुरा' रंगला होता. आमदार मेघे यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र "मेगा' भरतीत दाखल झालेले कार्यकर्ते उमेदवारीसाठी अट्टाहास करीत राहिले. यामुळे शेवटी डिगडोह येथील एक उत्तम युवा नेते विनोद ठाकरे यांनी भाजपला "रामराम' करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची पत्नी सुचित्रा ठाकरे यांची जि.प. सदस्यपदी वर्णी लावली. ज्येष्ठ नेते बबनराव आव्हाले यांनी भाजपला "रामराम' केला. राष्ट्रवादीकडून पंचायत समिती सदस्यपदी त्यांची वर्णी लागली. डिगडोहमध्ये भाजपने सुरेश काळबांडे यांच्या गटाला जास्त महत्त्व दिले. यामुळे या सर्कलमध्ये भाजपला जबरदस्त फटका बसला. कोटगुले गटाचेही पानिपत झाले. 

क्‍लिक करा  : #zpelectionresults ः शिवसेना खल्लास, एकच उमेदवार विजयी 

स्वराज्य संस्था निवडणुकीत "कमळ' चिखलात 
खडकी जिल्हा परिषद सर्कलमध्येही भाजपमध्ये उमेदवारीवरून रणकंदन माजले होते. माजी पं.स. सदस्य राजेंद्र वाघ यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. माजी जि.प. सदस्य वंदना पाल याच क्षेत्रासाठी आग्रही होत्या. भाजप तालुका अध्यक्ष विशाल भोसले यांनीही आपल्या आईचे नाव पुढे केले होते. वादावादी वाढल्यामुळे शेवटी शांत स्वभावाचे राजेंद्र वाघ यांनी माघार घेतली. यामुळे पक्षाने शेवटी वंदना पाल यांना तिकीट दिले. वाघ परिवाराचा जनसंपर्क खडकी सर्कलमध्ये जास्त होता. मात्र प्रचारापासून वाघ कुटुंबीय अलिप्त राहिले. याचा फटका भाजपला बसला. टाकळघाट येथे माजी पं.स. उपसभापती हरिश्‍चंद्र अवचट यांनीही जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भक्कम पाठिंबा दिला. भाजप उमेदवार आतीश उमरे युवा व मनमिळाऊ कार्यकर्ता असल्याने स्वतःची जागा काबीज केली. रायपूर जिल्हा परिषद क्षेत्रातही स्थानिक उमेदवारांना डावलले. पंचायत समिती क्षेत्रातही उमेदवारी देताना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून आली. यामुळे जिल्हा परिषदेत दोन जागांवर पाणी फेरले गेले. 14 पंचायत समिती क्षेत्रांपैकी केवळ 6 जागा मिळाल्या. यामुळे पंचायत समितीची सत्ता ही भाजपच्या हातून गेली. 

क्‍लिक करा: खिल्ला-या बैलाची जोडी गेली चक्‍क न्यायालयात 

"चहापेक्षा केटली गरम' 
भाजपच्या संघटनेत "चहापेक्षा केटली गरम' हा प्रकार वाढला आहे. केटलीच्या वाढत्या प्रभावामुळे पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भाजपचे जुने निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते बाजूला सारले गेले आहेत. आमदारांच्या सभोवताल असणारे "व्हाइट कॉलर' कार्यकर्ते जास्त दिसून येतात. यामुळे पक्षात गटातटाचे राजकारण दिसून येत आहे. 

क्‍लिक करा : समीरने लावली अंकुशच्या गळयावर तलवार, नंतर घडला हा थरार 

आमदार मेघेंपुढे आव्हान 
माजी जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे या पक्षातून दुरावल्या. यानंतर त्यांना जवळ आणण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. आमदार समीर मेघे नेहमीच कोणतीही निवडणूक असो तन-मन-धनाने काम करतात. उमेदवाराच्या विजयासाठी प्रचारात संपूर्ण ताकद लावतात. मात्र गटबाजी करणारे कार्यकर्ते या प्रयत्नांना यश येऊ देत नाहीत, हे वास्तव आहे. गटबाजीचे राजकारण करणाऱ्यांना भाजपतील वरिष्ठांनी आता लगाम लावणे गरजेचे आहे. यासाठी आता आमदार मेघे पुढाकार घेणार का, हे पाहणे गरजेचे आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP hits 'mega' blow in Hingna