अव्वाच्या सव्वा वीजबिलामुळे ग्राहकांना शॉक; भरमसाट वीजदरवाढ लादली

BJP stage protest against increased electricy bill
BJP stage protest against increased electricy bill

नागपूर : अव्वाच्या सव्वा वीजबिलामुळे ग्राहकांना शॉक लागला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे भरमसाट वीजबिलाविरोधात मंगळवारी एकाचवेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व ऊर्जामंत्र्यांचा धिक्कार नोंदवित ग्राहकांच्या तक्रारींचे गठ्ठे उपकेंद्रातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले.
भाजपतर्फे आंदोलनासाठी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक वीज उपकेंद्राची निवड करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन वीजदरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या परस्परविरोधी भूमिकेकडे लक्ष वेधले. एकीकडे त्यांनी नागरिकांना मर्यादित युनिट नि:शुल्क वीज देण्याचे संकेत दिले. त्यानंतर वीजदर घटल्याचा दावा केला. प्रत्यक्षात ग्राहकांवर भरमसाट वीजदरवाढ लादण्यात आली असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

तीन महिने अर्थचक्रच थांबले होते. त्यामुळे भरमसाट दरवाढ लादणे अन्यायकारक आहे. दरवाढ रद्द करून वीजबिलास सवलत देण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली. बिलसंदर्भात ग्राहकांची कुठेही दखल घेतली जात नसल्यानेही आंदोलकांनी संताप व्यक्त केला. तक्रारींचे गठ्ठे संबंधित उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना देऊन दोन दिवसांमध्ये तक्रारींचे निवारण करण्याचा इशारा देण्यात आला.

काटेकोर सुरक्षा व्यवस्था
ग्राहकांचा रोष लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तुळशीबाग उपकेंद्रासमोर मोठ्यासंख्येने पोलिस कर्मचारी तैनात होते. आंदोलकांमुळे छापरूनगर चौकात वाहतूक थांबल्याची स्थिती होती.

शंभर युनिटपर्यंत माफ करा
वीज दरवाढ लादणे अन्यायकारक आहे. सरकारने दरमहा शंभर युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करावे. टप्प्याटप्प्यात हे आंदोलन होणार आहे. पण, सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com