पत्नी म्हणायची ‘हिंमत ठेवा, सावकाराचे कर्ज पै-पै करून फेडून टाकू’; मात्र, पतीला त्रास झाला होता असह्य

अनिल कांबळे
Saturday, 17 October 2020

सावकार थेट घरी येऊन हेमंत आणि पत्नीशी असभ्य भाषेत बोलून हेमंत यांना त्रास द्यायला लागला. त्याच्या त्रासाला हेमंत कंटाळले होते. त्यांनी अनेकदा पत्नीशी बोलताना गुलाबचा त्रास असह्य होत असल्याचे सांगितले. ‘हिंमत ठेवा... सावकाराचे कर्ज पै-पै करून फेडून टाकू’ अशी पत्नी धीर देत होती. मात्र, सावकार रोज हेमंत यांना कर्जाच्या परतफेडीसाठी त्रस्त करून सोडत होता.

नागपूर : नवीन व्यवसाय थाटण्यासाठी घेतलेल्या ४० लाखांच्या कर्जाला अवैध सावकाराने अव्वाच्या सव्वा व्याजदर लावून ८५ लाख रुपये बळजबरीने घेतले. त्यानंतरही सावकाराने कर्जदाराला मानसिक व शारीरिक त्रास देत त्रस्त करून सोडले. शेवटी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून कर्जदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुलाब यज्ञनारायण दुबे (४८, रा. म्हाडा कॉलनी, अमरावती रोड) असे आरोपी सावकाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत विजयराव खराबे (५०, रा. स्नेहनगर) यांनी नवीन व्यवसाय थाटण्यासाठी अवैध सावकार गुलाब दुबे याच्याकडून ४० लाखांचे कर्ज घेतले होते. त्याला काही टक्के व्याजदर ठरविण्यात आला. त्यानुसार महिण्याकाठी व्याजारी रक्कम आणि मुद्दल रकमेतील काही भाग चुकता करण्यात येत होता. अशाप्रकारे हेमंत यांना आतापर्यंत ८५ लाख रुपये सावकार गुलाब दुबे याला दिले.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला

मार्च महिण्यापासून लॉकडाउन लागल्यामुळे व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे पैशाची चणचण भासायला लागली. त्यामुळे सावकार गुलाबचे व्याजाचे पैसे थकले. सावकार सुरुवातीला घरी येऊन दमदाटी करायला लागला. त्यानंतर काही दिवसांनी फोनवरून ठार मारण्याच्या धमक्या द्यायला लागला. त्यामुळे हेमंत भीतीच्या वातावरणात जगायला लागले.

सावकार थेट घरी येऊन हेमंत आणि पत्नीशी असभ्य भाषेत बोलून हेमंत यांना त्रास द्यायला लागला. त्याच्या त्रासाला हेमंत कंटाळले होते. त्यांनी अनेकदा पत्नीशी बोलताना गुलाबचा त्रास असह्य होत असल्याचे सांगितले. ‘हिंमत ठेवा... सावकाराचे कर्ज पै-पै करून फेडून टाकू’ अशी पत्नी धीर देत होती. मात्र, सावकार रोज हेमंत यांना कर्जाच्या परतफेडीसाठी त्रस्त करून सोडत होता.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

आणखी १३ लाखांची मागणी

गुलाब दुबे याच्याकडून ४० लाखांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात गुलाबला हेमंत यांनी ८५ लाख रुपये दिले होते. यामध्ये व्याज आणि मुद्दल रक्कमेचा समावेश आहे. त्यानंतरही गुलाब हेमंत यांना अतिरिक्त १३ लाखांची मागणी करीत होता. कर्ज दिल्यानंतरही विनाकारण पैस उकळण्यासाठी सावकार त्रस्त करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मानसिक स्वास्थ बिघडले

हेमंत यांना होणारा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी जीवन संपवून सावकाराच्या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. २८ सप्टेबर २०२० ला दुपारी साडेतीन वाजता घरी कुणी नसताना घराच्या लोखंडी हूकला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पत्नी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीत आली. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांना पत्नी स्वाती खराबे यांच्या तक्रारीवरून आरोपी सावकार गुलाब दुबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Borrower commits suicide due to moneylender's troubles