
वीस ऑक्टोबरला पतंग उडवीत असताना विजेचा स्पर्श होऊन झालेल्या घटनेत जळालेल्या अकरा वर्षीय अथर्ववर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना तब्बल साडे तीन महिन्यानंतर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उमरेड (जि. नागपूर) : हळूहळू मकर संक्रांतीचा सण जवळ येतोय. त्यामुळे बच्चेकंपनीमध्ये पतंग उडवण्याचा आणि पकडण्याचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. मात्र याच नादात एक दुर्दैवी घटना उमरेडमध्ये घडली आहे.
वीस ऑक्टोबरला पतंग उडवीत असताना विजेचा स्पर्श होऊन झालेल्या घटनेत जळालेल्या अकरा वर्षीय अथर्ववर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना तब्बल साडे तीन महिन्यानंतर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रेवतकर लेआऊट कुंभारी मोहपा रोड २० ऑक्टोबरला सहावीत शिकणारा अथर्व अनिल शिंगाडे (वय ११) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान पतंग उडवीत असताना उच्च दाबाच्या विजेच्या तारांवर पतंग अडकली. त्याने पतंग काढण्यासाठी लोखंडी पाइपचा आधार घेतला होता. पाइपने पतंगीला काढत असताना त्याला विजेच्या तारांना स्पर्श होऊन जोरदार धक्का बसला.
त्यात त्याचे अंग भाजले होते. तेव्हापासून त्याच्यावर प्रथन नागपूर येथील एका खासगी दवाखान्यात व नंतर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा पाय निकामी झाला व दोन्ही हात तोडण्यात आले. त्यासाठी दवाखान्याचा सात ते आठ लाख रुपये खर्च झाला होता. परंतु शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने उमरेडमध्ये शोककळा पसरली आहे.
अथर्व कुटुंबात एकटाच मुलगा असून एक लहान बहिण, आई पाइपकंपनीत तर वडील अनिल हे एका कंपनीत अल्प वेतनावर काम करीत आहेत. अशातच ही घटना घडली. त्यात नागपूर येथील दवाखान्यात आजपर्यंत कमविलेली आणि काही उसनवारीवर रक्कम घेऊन मुलाच्या उपचारासाठी खर्च केले. घटनास्थळावरील ३३ के.व्ही.लाईन हटवून भूमिगत केली. परंतु लाईनचे खांब आणि स्टड संजय निनावेच्या घरासमोर असल्यामुळे या तारांना पतंगचा स्पर्श होऊन हा अपघात घडला.
संपादन - अथर्व महांकाळ