
नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील शेकडो कंपन्यांमध्ये दीड लाख विमाधारक कामगार व त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या भागात अत्याधुनिक असे कामगार रुग्णालय उभारण्याची घोषणा केंद्रच्या 'इसिक'ने केली. २०१६ मध्ये घोषणा केल्यानंतर जागेचा शोध घेण्यात आला.
नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना उपचारासाठी जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतर पार करून नागपुरातील सोमवारीपेठ येथील कामगार रुग्णालयात उपचारासाठी यावे लागते. ही बाब लक्षात घेत कामगारांना त्याच परिसरात आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने एमआयडीसीत पाच एकर जागेवर २०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची घोषणा केंद्रीय कर्मचारी विमा मंडळाने (ईएसआयसी) केली होती. २०१९ मध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नागपुरात नारळही फोडला. मात्र, अद्याप हे रुग्णालय कागदावरच असल्याची धक्कादायक माहिती आहे.
हेही वाचा - जागतिक एड्स दिवस : प्रथमच घटला एचआयव्हीग्रस्तांचा आकडा...
नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील शेकडो कंपन्यांमध्ये दीड लाख विमाधारक कामगार व त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या भागात अत्याधुनिक असे कामगार रुग्णालय उभारण्याची घोषणा केंद्रच्या 'इसिक'ने केली. २०१६ मध्ये घोषणा केल्यानंतर जागेचा शोध घेण्यात आला. बुटीबोरी भागातील पोही गावाजवळची पाच एकर जागा निश्चित करण्यात आली. ईएसआयसीच्या एका उच्चस्तरीय चमूने नागपुरात येऊन बुटीबोरीतील कर्मचारी विमा मंडळाने(ईएसआयसी) जागेची पाहणी केली. सूत्रांनुसार स्थानिक कार्यालयाने या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली. परंतु, अंतिम निर्णय समितीची शिफारस आणि मुख्यालयाच्या भूमिकेवरच अवलंबून असल्याचे बोलले जाते. ईएसआयसीचे सहाय्यक संचालक मनोज कुमार यादव यांनी एमआयडीसीने अगोदर ज्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता ती बदलल्याची माहिती आहे.
हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षा कमी भाव
१८० कोटीचा प्रकल्प -
ईएसआयसीतर्फे बुटीबोरी येथील प्रस्तावित अत्याधुनिक रुग्णालयाचा प्रकल्प १८० कोटींचा आहे. येथे हृदय तसेच कॅन्सर रुग्णांसाठी विशेष सुविधा राहतील, असा दावाही केला जात आहे. ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. यापैकी राज्य सरकारने मंजूर केलेला २ कोटींचा हप्ता देण्यात आला असल्याचीही माहिती आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसंदर्भात ईएसआयसीचे संचालक प्रवीण सहगल यांच्याशी संपर्क साधला त्यांनी नागपूरच्या मुख्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, नागपुरातील कार्यालयाशी संपर्क होऊ शकला नाही.