"राजे हो, काई बी करा पन मतदानाले गावात या"; बाहेरगावच्या मतदारांसाठी उमेदवारांची संपर्क मोहीम 

सतीश डहाट  
Thursday, 14 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोचतात. सर्वसाधारण तीन अंकी मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागातील उमेदवार मतदारांशी कसून संपर्क साधत आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात किंवा बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत.

कामठी (जि. नागपूर):  ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग रचनेच्या आवाक्यानुसार मतदारसंख्या कमी असते. प्रत्येक उमेदवार एकेका मतासाठी झगडत असतो. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेल्या मतदारांसाठी उमेदवारांचा कस लागला आहे. स्थलांतरित झालेल्या मतदारांची मनधरणी जोरात सुरू झाली आहे. ‘काय पण करा, मतदानाला गावाकडे या,’ अशी उमेदवारांकडून विनवणी सुरू आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोचतात. सर्वसाधारण तीन अंकी मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागातील उमेदवार मतदारांशी कसून संपर्क साधत आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात किंवा बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत. प्रत्येक गावातील मतदार मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत. अशा स्थलांतरित मतदारांसाठी उमेदवारांनी त्याला गावात आणण्यासाठी तयारी चालवली आहे. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

याद्या हातात घेऊनच स्थलांतरित मतदारांचा शोध घेत उमेदवार संपर्क साधत आहेत. या मतदारांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत त्यांचे मत मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. स्थलांतरित मतदारांना त्यांच्या प्रवासाची सोय करण्याबरोबर बडदास्त ठेवण्यापर्यंत आश्वासन दिले जात आहे. आधीच नव्या वार्ड रचनेत एकाच गल्लीतील मतदारांची नावे अनेक वॉर्डांत विभगल्याने एकगठ्ठा ‘व्होट बँक’विखुरली गेली आहे. यामुळे वार्ड रचना अस्ताव्यस्त झाल्याने उमेदवारांची पंचाईत झाली आहे. प्रचार करताना उमेदवारांची प्रत्येक मतासाठी धडपड सुरू आहे. प्रभागातील गावात वास्तव्यास असणाऱ्या मतदारांबरोबर स्थलांतरित मतदारांच्या वजनाने आपले पारडे जड करण्यासाठी उमेदवार गुंतले आहेत. 

प्रवेशबंदी करणाऱ्यांकडून पायघड्या व फोनवर फोन 
गावात कोरोना काळात प्रवेशबंदी करणारे आता शहरातील स्थलांतरित मतदारांसाठी पायघड्या घालताना दिसत आहेत. स्थलांतरित मतदारांसाठी उमेदवार ‘फिल्डींग’ लावत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने वारंवार भेटून संपर्क ठेवण्यात उमेदवार पुढे आहेत, तर स्थलांतरित मतदारांशी मोबाईलवर संवाद साधत आहेत. स्थलांतरित मतदारांसाठी ‘फोनवर फोन’ हा प्रचाराचा फंडा उमेदवारांकडून सुरू आहे. 

मोठी कुटुंबे गळाला लावण्याचे प्रयत्न 

सध्या एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली असली तरी प्रत्येक प्रभागात किमान दोन चार तरी अशी कुटुंब टिकून आहेत. साहजिकच या कुटुंबात मतदारांची संख्याही अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन उमेदवारांकडून या कुटुंबावर अधिक लक्ष दिले जात आहे. एकगठ्ठा मते मिळवून लढाई सोपी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्याशी थेट संपर्क ठेवला जात आहेच, 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

पण या कुटुंबाशी जवळचे असणाऱ्या व्यक्तींकडून साकडे घातले जात आहे. राजकारणापासून दूर असणाऱ्या, पण समाजात वट असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांना आपलेसे करण्याचा जोरदार प्रयत्न उमेदवारांनी चालविला आहे. अशा व्यक्तींनी आपल्यासाठी शब्द टाकल्यास तो अधिक प्रभावी ठरू शकेल, हे त्यामागील गणित आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी उमेदवारांची उठ बस वाढल्याचे दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates are trying to call voters living outside village in Gram panchayat Election