लॉकडाउन आणि ‘वर्क फ्रॉम होम'मुळे वाढले घरातील वादविवादांचे प्रमाण; सात महिन्यात २०६ प्रकरण 

राजेश चरपे 
Saturday, 28 November 2020

कोरोना काळात पुरुषांप्रमाणे अनेक महिलाही घरून काम करत आहेत. कोरोना साथीमुळे घरकाम करण्यासाठी मदतनीस उपलब्ध नसल्याने ती जबाबदारीही घरातील महिलांवर येऊन पडली आहे.

नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. लोक घरात बसून आहेत. यामुळे पती-पत्नीमधील, कुटुंबांतील वाद विकोपाला पोहोचले आहेत. लॉकडाउन आणि 'वर्क फ्रॉम होम'मुळे नागपुरातील कौटुंबिक हिंसाचार, वादविवाद वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्हा परिषदेतील वसुंधरा महिला सपुदेशन केंद्राकडे २०६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

कोरोना काळात पुरुषांप्रमाणे अनेक महिलाही घरून काम करत आहेत. कोरोना साथीमुळे घरकाम करण्यासाठी मदतनीस उपलब्ध नसल्याने ती जबाबदारीही घरातील महिलांवर येऊन पडली आहे. अशा स्थितीत मुले, घर आणि कार्यालयाचे काम अशी तिहेरी जबाबदारी सांभाळताना घरात पुरुषांचे सहकार्य नसल्याने अनेक कुटुंबांत वादाची ठिणगी पडली आहे. 

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

काही ठिकाणी पुरुषांचा रोजगार गेल्याने आर्थिक कारणामुळे, तर काही ठिकाणी व्यसनाधीनता वाढल्याने तणाव निर्माण झाले आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारी सध्या महिला तक्रार निवारण केंद्रांकडे येत आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यानंतर यात घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. 

मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आले. जवळपास चार महिने ही परिस्थिती होती. या काळात अनेकांचा व्यवसाय गेला तर अनेकांना घरून कामे करावी लागली. याचा सकारात्मक परिणाम कमी आणि नकारात्मक परिणाम जास्त राहिला. कौटुंबिक वादाचे प्रकरण पोलिस ठाण्यासह महिला समुपदेशन केंद्रात वाढले. 

क्लिक करा - लाख मोलाच्या रस्त्यांना मोठमोठ्या खड्ड्यांचे डाग; प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात गोलमाल

जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या वसुंधरा महिला समुपदेशन केंद्रात एप्रिलपासून ऑक्टोबरदरम्यान जवळपास ५४८ प्रकरण आले. यातील बहुतांश प्रकरण पुरुष किंवा महिलेचा रोजगार गेल्याने वाद निर्माण झाल्याचे होते. यातील ११४ प्रकरणात दोघांमध्ये समझोता करण्यात समुदेशन केंद्राला यश आले. तर १३ प्रकरण पोलिसांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cases of Family disputes are increased during lockdown