सावधान, जिल्ह्यात रविवारी आढळले अकरा "पॉझिटिव्ह'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

परिसरातील लोकमान्यनगरातील 60 वर्षीय वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. रविवारी त्याच परिवारातील मृताचा मुलगा, नात, व्याही आणि विहीन असे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच शेजारच्या दोघांना लागण झाली. असे एकूण सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एमआयडीसी पोलिस व तहसीलदार परिसरात पोहोचले असून, हा परिसर सील केला आहे.

नागपूर (ग्रामीण) :  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, रविवारी सावेनर तालुक्‍यात दोन तर कोराडी शहरात एकाच कुटुंबातील तिघे तर हिंगणा तालुक्‍यातील लोकमान्य नगर , गजानन नगर परिसरातील सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही नक्‍की वाचा : (Video) टोळधाड आल्याचे समजताच गृहमंत्री शेतक-यांच्या बांधावर

दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
सावनेर/केळवद:  तालुक्‍यातील दहेगावपाठोपाठ सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनोली या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी प्रशासनातर्फे सोनोलीसह लगतचे पानउबाळी गाव "सील' करून दोन्ही गावांमध्ये "हायरिक्‍स सर्वे' करून रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना नागपूर येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याची वार्ता ऐकून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. मात्र, ट्रॅव्हल हिस्ट्रीमुळे तालुक्‍यात कोरोना पाय रोवणार याविषयी शक्‍यता वर्तविली जात असताना अजनी व जटामखोरा गावात बाहेरून येणारे प्रत्येकी एक असे तालुक्‍यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परत नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्‍यातील केळवदनजीकच्या जटामखोरा येथे चेन्नई येथून आलेल्या दोन 23 वर्षीय तरुणांपैकी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण गाव सील करण्यात आले. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइनसाठी पाठविण्याच्या हालचालीला वेग आला आहे. जटामखोरा येथील दोन 23 वर्षीय वयोगटातील तरुण 26 मेला चेन्नई येथून गावाला परत आले. ते चेन्नई येथे एका दुकानात मार्केटिंगचे काम करायचे. त्यांना 28 तारखेला कॉरंटाइन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी 29 मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट घेण्याकरिता नागपूरला दाखल करण्यात आले. यातील एका तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने या भागात दहशत पसरली. प्रशासनाने या गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून नागरिकांना धीर दिला आहे. रुग्णांच्या संपर्कातील जटामखोरा येथील 8 व अजनी शेरडी येथील 15 लोकांना नागपूर येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य विभागाने कोरोना लक्षणाच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली असून, पुढील 14 दिवसांपर्यंत आशा वर्कर व आरोग्य विभागाच्या चमूचे सर्वेक्षण राहणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मधुकर सोनुने यांनी सांगितले.

एकाच परिवारातील तीन पॉझिटिव्ह
कोराडी : महादुला येथील रमाईनगरातील एकाच परिवारातील तीन रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्णांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी रमाईनगर येथेही एका चालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 40 नागरिकांना क्‍वारंटाइन करण्यात आले होते. यापैकी 18 नागरिकांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 15 नागरिकांची प्राथमिक तपासणी निगेटिव्ह आली आहे, तर 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या चार झाली आहे.

हेही वाचा  : (Video)माकडाचे पिल्लू  घेत आहे "ऑनलाइन' शिक्षण

हिंगण्यात एकूण सहा पॉझिटिव्ह, चिमूकलीही बाधीत

हिंगणा एमआयडीसी: परिसरातील लोकमान्यनगरातील 60 वर्षीय वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. रविवारी त्याच परिवारातील मृताचा मुलगा, नात, व्याही आणि विहीन असे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच शेजारच्या दोघांना लागण झाली. असे एकूण सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एमआयडीसी पोलिस व तहसीलदार परिसरात पोहोचले असून, हा परिसर सील केला आहे. परिसरात ग्रामपंचायतीने फवारणी केली असून अधिकारी पहारा देत आहेत. परिसरातील जनतेने सावध राहण्याच्या सूचना दवंडीमार्फत देणे सुरू आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, रविवारी सावेनर तालुक्‍यात दोन तर कोराडी शहरात एकाच कुटुंबातील तिघे तर हिंगणा तालुक्‍यातील लोकमान्य नगर , गजानन नगर परिसरातील सहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caution, eleven "positives" were found in the district on Sunday