ऑस्ट्रेलियातील नवरोबाकडून युवतीची फसवणूक; लाखोंचे दागिने हडपले; मोबाइलवरून दिला ‘ट्रिपल तलाक’ 

अनिल कांबळे
Monday, 19 October 2020

हुसेन इस्माइल काखडची (वय ४८ रा.कतार), त्याची आई रशिदा इस्माइल काखडची (वय ६३,रा. आयबीएम रोड, पुणे) बहीण रेश्मा अजीज अडवाकर (वय ४९) आणि जावई अजीज अडवाकर (वय ५० दोन्ही रा. एमआयजी कॉलनी, कुर्ला, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नागपूर ः ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व असलेल्या आरोपीने मॅट्रिमोनिअल साइटवरून नागपूरच्या युवतीशी विवाह केला. दुबईत मोठ्या कंपनीत नोकरीवर असल्याचे सांगून लग्नात तब्बल ३५ लाखांचे दागिने हडपले. त्यानंतर मोबाइलवरच ‘ट्रिपल तलाक’ देत फसवणूक केली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून पती, सासूसह चौघांविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले आहेत. 

हुसेन इस्माइल काखडची (वय ४८ रा.कतार), त्याची आई रशिदा इस्माइल काखडची (वय ६३,रा. आयबीएम रोड, पुणे) बहीण रेश्मा अजीज अडवाकर (वय ४९) आणि जावई अजीज अडवाकर (वय ५० दोन्ही रा. एमआयजी कॉलनी, कुर्ला, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रेश्मा हुसेन काखडची (वय ३२) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा या फॅशन डिझायनर आहेत. एक वर्षापूर्वी शादी डॉट कॉमवर त्यांची हुसेन याच्यासोबत ओळख झाली. यावेळी हुसेन याने त्याचे वय ३५ वर्षे सांगितले. दुबई-कतारमध्ये एका पेट्रोलियम कंपनीत अभियंता आणि मासिक सात लाख रुपये पगार असल्याचे सांगितले. हुसेन याने रेश्मा यांचा विश्वास संपादन केला. दोघेही मोबाइलद्वारे चॅटिंग करू लागले. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नात रेश्मा यांना २५ लाखांचे स्त्रीधन मिळाले.

मोठी बातमी : गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत सहा नक्षली ठार; चार महिला व दोन पुरुषांचा समावेश 
 

रेश्मा हुसेनसोबत मुंबईला राहायला लागल्या. यादरम्यान हुसेनच्या नातेवाइकांनी रेश्मा यांचे स्त्रीधन हडपले. त्यांचा छळ सुरू केला. रेश्मा यांच्या नातेवाइकाकडून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर हुसेन रेश्मा यांना घेऊन कतारला गेला. तेथेही त्यांचा छळ सुरू केला. याचदरम्यान हुसेन हा ४८ वर्षांचा असल्याचे त्यांना कळले. लॉकडाउन लागण्यापूर्वी रेश्मा या नागपुरात परतल्या. नागपुरात आल्यानंतर हुसेनने मोबाइलवरच रेश्मा यांना तीन तलाक दिला. रेश्मा यांनी मानकापूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हृदयद्रावक! आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून चिमुकल्यासह बापाचा महामार्गावर टाहो

पती निघाला विवाहित 

हुसेन याने आपण अविवाहित असल्याचे रेश्‍मा यांना सांगितले होते. परंतु, त्याचे आधीही लग्न झाले असून त्याची पत्नी व दोन मुले ऑस्ट्रेलियाला रहात असल्याचे रेश्मा यांना कळले. तोसुद्धा ऑस्ट्रेलियाला पत्नीच्या घरी राहत होता. पहिल्या पत्नीलाही हुसेनने खोटे बोलून लग्नाच्या बेडीत अडकवले होते. रेश्माने हुसेन याला जाब विचारला असता त्याने मारहाण केली. त्यांना खोलीत कोंडून ठेवले. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating with a young woman by Australian husband; gave 'Triple Talak' on mobile