मोठी बातमी: गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत सहा नक्षली ठार; चार महिला, दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश

मिलिंद उमरे/ राजेंद्र मारोटकर 
Sunday, 18 October 2020

रविवारी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वात सी- ६० पथकाचे कमांडो धानोरा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या कोसमी- किसनेली जंगल परिसरात  नक्षलविरोधी अभियान राबवित होते.

गडचिरोली : धानोरा उपविभाग अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोसमी- किसनेली जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात पोलिस सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यशस्वी झाले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

रविवारी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वात सी- ६० पथकाचे कमांडो धानोरा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या कोसमी- किसनेली जंगल परिसरात  नक्षलविरोधी अभियान राबवित होते. याच सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

पोलिसांच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना प्रथम पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर रात्री उशिरा आणखी एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या सहा झाली आहे. 

रात्री सर्वत्र अंधार पसरल्याने पोलिसांना शोधमोहीम थांबवावी लागली. उद्या, सोमवारी सकाळी ती पुन्हा सुरू करण्यात येईल. चार नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक अंकित गोयल रुजू झाल्यानंतरचे हे पोलिस विभागाचे पहिलेच मोठे यश आहे. 

सविस्तर वाचा - लग्नास नकार दिल्याने घरमालकाकडून भाडेकरू शिक्षिकेला मारहाण, गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, जानेवारी २०२० पासून आतापर्यंत पोलिसांनी एकूण १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून, नक्षल चळवळीला मोठी चपराक बसली आहे. 

ड्रोन वापरूनही ठरले दुर्दैवी!

काळासोबत नक्षलवादीसुद्धा अपडेट होत आहेत. त्यांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील जिमलगट्टा पोलिस ठाणे तसेच झिंगानुर व देचलीपेठा पोलिस मदत केंद्राच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता नक्षलवादी मोठा घातपात करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण पोलिस विभागाने त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवत आपण त्यांच्या अनेक कोस पुढे असल्याचे सिद्ध केले.

संपादन - अथर्व महांकाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total six naxalwadis are encountered by police in gadchiroli