गृहमंत्र्यांचे शहर प्रभारींच्या भरोशावर, अधिकाऱ्यांची तब्बल एवढी पदे रिक्‍त... 

City police force in additional charge, awaiting transfer of police officers
City police force in additional charge, awaiting transfer of police officers

नागपूर : राज्याची उपराजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराच्या पोलिस दलाचा कारभार अतिरिक्‍त पदभारावर सुरू आहे. नागपूर पोलिस दलात अर्ध्याअधिक पोलिस अधिकाऱ्यांकडे अन्य विभागांचा अतिरिक्‍त पदभार आहे. गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात चक्‍क सहा मोठी पदे रिक्‍त असल्याने गृहमंत्र्यांसह पोलिस महासंचालकांचेही दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या रोखण्यात आल्या होत्या. मात्र, चारच महिन्यांनंतर राज्य शासनाने आला निर्णय फिरवीत बदल्या सुरू केल्या. यात आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, नागपूर शहर पोलिस दलातील दोन पोलिस अधिकारी एस. निर्मला देवी आणि चिन्मय पंडित यांच्या बदल्या झाल्या. दोन्ही वरिष्ठ पोलिस अधिकारी नागपुरातून गेल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप नवे अधिकारी आले नाहीत. 

सध्या शहरात पाच आयपीएस अधिकारी तर पाच एसपीएस (मपोसे) अधिकारी आहेत. त्यामधील पाच पोलिस अधिकाऱ्यांकडे दोन विभागांचा प्रभार आहे. त्यामुळे पोलिस उपायुक्‍तांकडे अतिरिक्‍त जबाबदारी देण्यात आली आहे. दोन विभागाच्या जबाबदाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांवर ताण निर्माण झाला आहे. डीआयजी डॉ. नीलेश भरणे यांच्याकडे गुन्हे शाखेच्या अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍तपदासह सहपोलिस आयुक्‍त (जॉइंट सीपी) या महत्त्वाच्या पदाचा प्रभार देण्यात आला आहे. तर दक्षिण विभागाचे अप्पर पोलिस आयुक्‍त डॉ. शशिकांत महावारकर यांच्याकडे उत्तर विभागाचीही अतिरिक्‍त जबाबदारी देण्यात आली आहे. 

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त विवेक मासाळ यांच्याकडे गुन्हेगारांसाठी नंदनवन असलेल्या झोन चारची अतिरिक्‍त जबाबदारी देण्यात आली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजल्या जाणारे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्याकडे पोलिस मुख्यालयाची अतिरिक्‍त जबाबदारी देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या पोलिस उपायुक्‍त श्‍वेता उपायुक्‍त यांच्याकडे अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या विशेष शाखेची अतिरिक्‍त जबाबदारी देण्यात आली आहे. अतिरिक्‍त जबाबदाऱ्यांमुळे पोलिस अधिकाऱ्यांवर अतिरिक्‍त ताण येत असल्याची चर्चा आहे. 
 

रिक्‍त पदे कधी भरणार? 


गृहमंत्री अनिल देशमुख यांचे शहर असलेल्या नागपुरात अतिमहत्त्वाचे पद असलेले सहआयुक्‍त पद रिक्‍त आहे. त्या पदाची अतिरिक्‍त जबाबदारी आयपीएस डॉ. नीलेश भरणे यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच अप्पर आयुक्‍तांचे उत्तर रिजन, विशेष शाखा, परिमंडळ-4 आणि पोलिस मुख्यालय हे विभाग अजूनही रिक्‍त आहे. ही पदे केव्हा भरणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 
 

बदल्याही रखडल्या 


राज्यातील शेकडो आयपीएस आणि मपोसे दर्जाचे पोलिस अधिकारी बदली होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या उपायुक्‍त, अधीक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र, बदल्या होणार या आशेत मन मारून उपायुक्‍त दर्जाचे अधिकारी काम करीत आहेत. यासोबत अनेक पोलिस निरीक्षक दर्जाचेही अधिकारी कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे बदलीच्या आशेवर आहेत. 
संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com