पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग आठ फेब्रुवारीपासून; मनपा आयुक्तांनी काढले आदेश

राजेश प्रायकर
Saturday, 23 January 2021

बंद खोल्यात वर्ग घेऊ नये, वर्ग खोल्यांची दार, खिडक्या उघड्या ठेवाव्या, खिडक्या नसलेल्या खोलीत वर्ग घेऊ नये, असेही निर्देश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व शाळांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले की नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी मनपा शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

नागपूर : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहेत. चार जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी आदेश काढले. कोरोनासंबंधातील मार्गदर्शक सूचना आणि अटींचे पालन करून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग आठ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे शिक्षकांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करावा लागणार आहे.

आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील नववी ते बारावीपर्यंत शाळा, महाविद्यालय चार जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. शाळा सुरू करताना आवश्यक उपाययोजनांच्या सूचनाही त्यांनी आदेशातून केल्या आहेत. शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण्यासोबतच शाळेत थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

जाणून घ्या - ‘आत्महत्या’वार : विदर्भात तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; सोबत दोघांनी घेतला गळफास

स्कूलबसचे निर्जंतुकीकरण, शाळेतील बैठक कक्षात सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा, शाळेत दर्शनी भागात मास्कचा वापर, सॅनिटायझर वापराबाबत मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात यावे, रांगेतील मुलांचे अंतर सहा फूट असावे, त्यासाठी विशेष चिन्ह तयार करावी, शाळेत येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग स्वतंत्र असावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिकाक्षेत्रात मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, असेही निर्देशही त्यांनी दिले आहे.

बंद खोल्यात वर्ग घेऊ नये, वर्ग खोल्यांची दार, खिडक्या उघड्या ठेवाव्या, खिडक्या नसलेल्या खोलीत वर्ग घेऊ नये, असेही निर्देश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व शाळांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले की नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी मनपा शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

नक्की वाचा - गृहमंत्र्यांकडून पोलिस भरतीचा संभ्रम दूर; दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी नंतरच लेखी परीक्षा

अशा आहेत अटी

  • खिडक्या नसलेल्या खोलीत वर्ग घेता येणार नाही
  • वर्ग खोलीच्या खिडक्या व दारे कायम उघडी ठेवावी
  • स्कूल बसचे दिवसातून दोनदा निर्जंतुकीकरण
  • रांगेतील दोन विद्यार्थ्यांत सहा फुटाचे अंतर
  • शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार

शहरातील एकूण शाळा - ५९३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Classes five through eight from February eight school news