'एम. कॉम'सह 'एस. एस्सी'च्या प्रवेशात महाविद्यालयांची चांदी, विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

मंगेश गोमासे
Thursday, 21 January 2021

नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संलग्नित महाविद्यालयांचा मनमानी कारभार थांबावा या उद्देशाने सुरुवातीला विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि नंतर संलग्नित महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती सुरू केली होती.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेश सुरू असून वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तिसरी फेरी सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होत असल्याच्या तक्रारी येत आहे. विशेष म्हणजे रिक्त जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून एक लाख तर ५० हजारांपर्यंतची वसुली केली जात आहे. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संलग्नित महाविद्यालयांचा मनमानी कारभार थांबावा या उद्देशाने सुरुवातीला विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि नंतर संलग्नित महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती सुरू केली होती. मात्र, यंदा एम.एसस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांनी सुरू केलेला घोडेबाजार बघता या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. विद्यापीठाने ऑनलाइन प्रवेशाच्या केवळ दोनच फेऱ्या घेत सोमवारी सायंकाळी चार वाजता महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यावर इच्छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. मात्र, यादी जाहीर होताच नामवंत महाविद्यालयांमधील एम.एसस्सी.चे प्रवेश पूर्ण झाले होते. या जागा भरताना एक लाख ते पन्नास हजारांपर्यंतची अतिरिक्त पैसे विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. गोरगरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या विदर्भातील नामवंत शिक्षण संस्थेमध्येही सर्रास हा प्रकार सुरू असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे रिक्त जागांची यादी बघून विद्यार्थी प्रवेशासाठी गेल्यास त्यांना एकही जागा शिल्लक नसल्याचे सांगून परत पाठवले जात आहे. 

हेही वाचा - महिलेच्या घरात घुसून डोक्यावर ठेवली बंदूक अन् केली विचित्र मागणी; घटनेनं परिसरात खळबळ   

प्रवेश समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह - 
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा सामान्य विज्ञानमध्ये प्रवेशाचा ओढा वाढला आहे. एम.एसस्सी.मध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांना विद्यार्थ्यांची अधिक मागणी असते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांमध्ये या विषयातील प्रवेशासाठी चढाओढ असते. याची जाणीव असतानाही केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशाच्या केवळ दोनच्या फेऱ्या का घेतल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रिक्त जागा आणि प्रवेश घेणारे विद्यार्थी असताना तिसरी फेरी घेतल्यास अनेकांना ऑनलाइन माध्यमातून प्रवेश मिळाला असता. शिवाय महाविद्यालयांकडून होणारी लूट रोखता आली असती. त्यामुळे विद्यार्थी संघटनांकडून प्रवेश समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: colleges take more fees for m com and msc admission in nagpur university