esakal | काँग्रेस करणार विदर्भावर ‘फोकस’; व्होट बँक पोखरली, चार उपाध्यक्षांची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Congress to appoint four vice presidents to focus on Vidarbha Nagpur political news

राष्ट्रवादीने परिवार यात्रा विदर्भातून सुरू केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या यात्रेत माजी केंद्रीय मंत्री तसेच खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते. त्यास चांगला प्रतिसाद लाभल्याने काँग्रेसचे नेते खडबडून जागे झाले आहेत.

काँग्रेस करणार विदर्भावर ‘फोकस’; व्होट बँक पोखरली, चार उपाध्यक्षांची नियुक्ती

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : दिवसेंदिवस मतपेढी पोखरत चालल्याने प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी चार उपाध्यक्ष विदर्भातील घेऊन काँग्रेसने आगामी लक्ष विदर्भावरच फोकस करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा विदर्भातीलच आहे.

एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा गढ मानला जात होता. इंदिरा गांधी यांना विदर्भानेच बळ दिले. मात्र, आता विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघातून एकच खासदार काँग्रेसचा आहे. सध्या अशी अवस्था असली तरी काँग्रेसची पाळेमुळे कायम असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होते.

अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?

विधान सभेतही बऱ्यापैकी काँग्रेसने कमबॅक केले आहे. त्यामुळे आत्ताच लक्ष घालून विदर्भात पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. प्रदेश कार्यकारिणीतील विदर्भाच्या नेत्यांचा केलेला भरणा बघता हे स्पष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्र चांगला बांधला आहे. विदर्भात काँग्रेसचे नेते आपसातील भांडणात आणि कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याने पर्याय म्हणून राष्ट्रवादीने हातपाय पसरणे सुरू केले आहे.

राष्ट्रवादीने परिवार यात्रा विदर्भातून सुरू केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या यात्रेत माजी केंद्रीय मंत्री तसेच खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते. त्यास चांगला प्रतिसाद लाभल्याने काँग्रेसचे नेते खडबडून जागे झाले आहेत.

अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

विदर्भात पर्याय म्हणून राष्ट्रवादीला जनतेने स्वीकारल्यास पक्ष नावालाच उरेल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाना पटोले या आक्रमक नेत्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. त्यांनी आपल्या दिमतीला नाना गावंडे, चारुलता टोकस, संजय राठोड आणि सचिन नाईक यांना सोबत घेतले आहे.

कितपत फायदा मिळणार?

नाना गावंडे सध्या फारसे सक्रिय नाहीत. राष्ट्रवादीमुळेच त्यांना हिंगणा विधानसभा मतदारसंघ बदलावा लागला. येथेही आता त्यांचे वर्चस्व राहिले नाही. चारुलता टोकस विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. मूळच्या वर्धेच्या असल्या तरी त्या निवडणुकीतच दिसतात असा आक्षेप त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा आहे.

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

सचिन नाईक पुसदचे असून बंजारा समाजाचे आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या टीममध्ये आहेत. संजय राठोड बुलढाण्यातील असून तेसुद्धा बंजारा समाजाचे आहेत. नाना पटोले यांच्या चमूत चारही उपाध्यक्ष सहभाही होणार असले तरी त्याचा फायदा काँग्रेसला कितपत मिळेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.