
रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त करीत गडकरी यांनी अपघातमुक्त शहरासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवींचा गौरव केला. त्याचवेळी त्यांनी देशातील ३० टक्के वाहनचालक परवाने बोगस असल्याचे नमुद करीत आरटीओवर निशाणा साधला.
नागपूर : शहरातील अपघातप्रवण स्थळांची माहिती घेऊन दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याची नगरसेवक, आमदारांची जबाबदारी आहे. परंतु, येथे राजू वाघसारखे कार्यकर्ते काम करीत आहे, असे नमुद करीत गडकरींनी नगरसेवक, आमदारांना चिमटा काढला. राजू वाघ यांनी आतापर्यंत ५०० लोकांचे जीव वाचविल्याचेही ते म्हणाले.
रस्त्यांवरील उभ्या वाहनांमुळेही अपघात होत आहे. रस्त्यावर बस, ट्रक आदी वाहने उभी ठेवणाऱ्यांवर दंड आकारणीसंदर्भात कायदा करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उभ्या वाहनांचा फोटो काढून संबंधित विभागाला पाठविणाऱ्यांना दंडाच्या रकमेतील निम्मी रक्कम दिल्यास बेरोजगारीचाही प्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले.
जाणून घ्या - ‘भारतात रस्ते इंजिनिअर नव्हे तर राजकारणी बांधतात’
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण नागपूर व प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित राष्ट्रीय सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर अभिनेते मकरंद अनासपुरे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, समीर मेघे, राजू पारवे, टेकचंद सावरकर, माजी आमदार प्रा. अनिल सोले, मधूप पांडे उपस्थित होते.
रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त करीत गडकरी यांनी अपघातमुक्त शहरासाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवींचा गौरव केला. त्याचवेळी त्यांनी देशातील ३० टक्के वाहनचालक परवाने बोगस असल्याचे नमुद करीत आरटीओवर निशाणा साधला. रस्ते अपघाताचे मूळ कारण अभियंते असून चुकीचे आराखडे तयार करीत असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी अधिकाऱ्यांवरही तोंडसुख घेतले. पालकमंत्री असताना शहरातील ८० चौक दुरुस्त करून अपघाताची संख्या कमी केल्याचे ते म्हणाले.
अपघात रोखण्यासाठी रोड सेफ्टी काऊन्सिल तयार करण्यात आली आहे. या काऊन्सिलने राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अपघातप्रवण स्थळे शोधण्यास सांगावे, ऐकत नसेल तर माझ्याकडे या, त्यांना दंडा लगावतो, असे गडकरी म्हणाले.