esakal | घडवून आणायचा होता थरारक हत्याकांड; पिस्तुल चोरीसाठी दिली सुपारी; चोरटे घाबरल्याने फसला ‘गेम' 
sakal

बोलून बातमी शोधा

contract killing game unsuccessful in nagpur

कुख्यात गुंड दुर्गेश पसेरकर याला अन्य टोळीच्या म्होरक्या सनीचा गोळ्या घालून 'गेम’ करायचा होता. एकेकाळी सनीने त्याच्यावर गोळी चालवली होती. गोळ्या झाडून खून केल्याने आपण शहराचा डॉन होऊ असेही त्याचे स्वप्न होते

घडवून आणायचा होता थरारक हत्याकांड; पिस्तुल चोरीसाठी दिली सुपारी; चोरटे घाबरल्याने फसला ‘गेम' 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः त्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याला गोळ्या घालून शहरात खळबळ उडवून द्यायची होती. यासाठी पिस्तूल हवी होती. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून ती चोरण्यासाठी दोन चोरांना सुपारी दिली. मात्र, पिस्तूल चोरल्यानंतर चोरटे घाबरल्याने एखाद्या थरारक आणि रहस्यमय चित्रपटाप्रमाणे आखलेला त्याचा सर्व गेम फसला.

कुख्यात गुंड दुर्गेश पसेरकर याला अन्य टोळीच्या म्होरक्या सनीचा गोळ्या घालून 'गेम’ करायचा होता. एकेकाळी सनीने त्याच्यावर गोळी चालवली होती. गोळ्या झाडून खून केल्याने आपण शहराचा डॉन होऊ असेही त्याचे स्वप्न होते. याकरिता त्याला पिस्तूल हवी होती. सुभाषनगर टी-पॉईंटजवळ राहणाऱ्या दुर्गेशला घराजवळच राहणारे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झालेले उपायुक्त ध्रुव पिसाराम आटे (७१) यांच्याकडे परवाना असलेली पिस्तूल आणि काडतूस असल्याचे ठाऊक होते.

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

 ते आधी चोरण्याचा त्याने प्लॅन आखला. सराईत चोरट्याशी संपर्क साधला. असलम अजहर काजी (१८, रा. पाटनकर चौक) आणि अभिषेक अशोक कोटांगळे (२१,नागार्जून कॉलनी) या दोघांना पिस्तूल चोरीची सुपारी दिली. त्यांना आटे यांचा दिनक्रम समजावून सांगितला तसेच पिस्तूल कुठे ठेवली आहे याचीही सविस्तर माहिती दिली.

१२ हजारात दिली सुपारी

असलम काजी हा मूळचा काटोलचा असून दुर्गेशच्या तिसऱ्या बायकोच्या मुलाचा मित्र आहे. त्याच्यासोबत तो दुर्गेशला भेटायला आला होता. त्याला दुर्गेशने पिस्तूल चोरीची १२ हजार रुपयांत सुपारी दिली. त्याने अभिषेक कोटांगळे याला गाठले. अभिषेक हा किरायाने आटो चालवायचा पण लॉकडाऊनमुळे तो बेरोजगार होता. त्याला असलमने आपल्या चोरीच्या कटात सहभागी केले.

अशी केली चोरी

पाच वाजता मॉर्निंग वॉकला जातात. सोमवारी असलम आणि अभिषेक त्यांच्या घराजवळ आले. अभिषेक आटे यांचा मागोमाग फिरून पाळत ठेवत होता तर असलम त्यांच्या घरात घुसला. २० मिनिटांच्या शोधानंतर त्याला कपाटात पिस्तूल आणि काडतूस सापडले. लगेच त्याने अभिषेकला मिसकॉल करीत मोहिम फत्ते झाल्याचा इशारा केला.

नक्की वाचा - कोरोनाच्या संकटावर मात करत अमरावतीचे डॉक्टर घेताहेत महिन्याला तब्बल दहा लाख किलो चिकनचे उत्पादन

असा लागला सुगावा

पिस्तूल चोरीला गेल्याची तक्रार आल्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी फुलारी, उपायुक्त राजमाने यांनी युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांच्यावर चोरीचा छडा लावण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी शेजारी राहणाऱ्या दुर्गेशवर पाळत ठेवली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. धागा मिळताच दुर्गेशच्या संपर्कातील पहिला व्यक्ती असलमला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अभिषेकची माहिती दिली. त्यानंतर दुर्गेशच्या डाव उधळून लावत तिघांनाही अटक केली. 

 संपादन - अथर्व महांकाळ