आमदार ठाकरे म्हणतात, आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहोत, म्हणून ...

अतुल मेहेरे
Wednesday, 23 September 2020

आमदार ठाकरे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये गेले होते. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आपसांत चर्चा केल्यानंतर पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले. आता नागपुरात शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्यांच्या फोडाफाडीचा प्रकार केला.

नागपूर : शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत जयस्वाल यांनी मंगळवारी पूर्व नागपुरातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना गळाला लावले. ५० ते ६० कार्यकर्त्यांना त्यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. कार्यकर्त्यांचा फोडाफाडीबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने निर्णय घ्यावा, असे कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.

आमदार ठाकरे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये गेले होते. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आपसांत चर्चा केल्यानंतर पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले. आता नागपुरात शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्यांच्या फोडाफाडीचा प्रकार केला. महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. अशा वेळी अशी कामे केली जातात. निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात जाणार कार्यकर्ते असतातच. पण महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा तिन्ही पक्षांची समन्वय समिती तयार झाली. या समितीमध्ये सर्व निर्णय होतात.

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

नागपुरात हा प्रकार घडल्यानंतर समन्वय समितीने याबाबत निर्णय घ्यायला हवा. मग तिन्ही पक्षांना एकमेकांचे कार्यकर्ते पळविण्याची सूट राहील. वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतल्यावर स्थानिक स्तरावर आम्हीही तसा निर्णय घेऊ शकू. नागपूर शहरात दोनच पक्ष आहेत ते म्हणजे कॉंग्रेस आणि भाजप. या दोनच विचारधारेचे लोक शहरात बहुसंख्येने आहेत. आमचा कॉंग्रेस पक्ष मोठा आहे आणि आमच्याकडेही इतर पक्षांतील कार्यकर्ते येण्यास इच्छूक आहेत. पण आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहोत, असे आमदार ठाकरे म्हणाले.

यासंदर्भात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीकडून जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत शहर कॉंग्रेस कमिटी याबाबत निर्णय घेणार नाही. पण आता आम्ही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना विनंती करणार आहो की, महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांतील नगरसेवक, कार्यकर्यांना आपल्या पक्षात घेण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असेही आमदार ठाकरे म्हणाले. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coordinating committee should take decision regarding Shiv Sena: Vikas Thackeray