मुंढेंचे कडक शासन; मृत्यूचा महापूर ते मुस्लिम बांधवांकडून हिंदूंच्या प्रेतांना अग्नी अन् नवा कोरोना स्ट्रेन

corona effect in nagpur look back 2020
corona effect in nagpur look back 2020

नागपूर : कोरोनाच्या भयापोटी माणुसकी हरवली, तर या बिकट अवस्थेत असताना अनेकांनी माणुसकी जपली, हे या वर्षाचे फलित आहे. वर्षाअखेर पुन्हा एकदा अचानक कोरोनाचा नवीन 'स्ट्रेन' मनात विचारांचे काहूर माजवत आहे. त्याचेही आव्हान पेलवत नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय हे येणारे दिवसच सांगतील. 

शहरी आरोग्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने मागील पन्नास वर्षांत कधीच आरोग्याचा डोलारा सांभाळला नव्हता. यामुळे कोरोनाचा कहर झाल्यास मेडिकल व मेयोशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. नागपुरात फेब्रुवारीत कोरोनाचे संशयित आढळून आले. ११ मार्च रोजी कोरोनाने नागपुरात शिरकाव केला. 

पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनावर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. नेमके या आणीबाणीच्या काळात महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे होते. त्यांनी शहराची सूत्रे हाती घेतली. ११ मार्च ते ३१ मार्च या काळात शहरात अवघे १६ बाधित होते. एप्रिलचे चार दिवस कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र, याच वेळी दिल्लीत तबलिगींचा तिरस्कार करणारे वातावरण तयार झाले. तोच तिरस्कार नागपूरच्या भूमीत बघायला मिळाला. मुंढे यांनी कोरोना नियंत्रणाचे विलगीकरणाचे (आयसोलेशन) हत्यार उपसले. सतरंजीपुरा, मोमिनपुरा असो की भालदारपुरा, टिमकी, शहरातील झोपडपट्टी अख्खी वस्ती विलगीकरणात पोहोचवण्यासाठी मुंढे  'ऑन दी स्पॉट' सज्ज होते. यामुळेच ३० एप्रिलपर्यंत कोरोनाचे नागपुरात १३८ रुग्ण आणि केवळ २ मृत्यू होते. ३१ मेपर्यंत बाधितांची संख्या ५३४ तर ११ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ३८१ जणांनी कोरोनावर मात केली. ३० जून रोजी बाधितांचा आकडा वाढून १,५०५ वर पोहोचला असला तरी कोरोनाचे मृत्यू नियंत्रणात होते. अवघे १४ मृत्यू जूनमध्ये झाले. जून संपत असताना शहरातील वातावरण बिघडले. मुंढेंनी विरोध पत्करूनही कामात तसूभरही कसर सोडली नाही. जुलैमध्ये ९३ मृत्यू तर चार हजारांवर रुग्णांची संख्या पोहोचली. 

कोरोनाचा कहर : सामाजिक सलोख्याचे चित्र -
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे एका दिवशी ६० मृत्यूची महायात्रा नागपूरने अनुभवली. तर एकाच दिवशी २ हजार बाधितांचा आकडाही बघितला. ऑगस्ट महिन्यात ८७० मृत्यू, तर सप्टेंबरमध्ये सुमारे १३०६, असे एकूण २१७६ मृत्यू अवघ्या दोन महिन्यांत झाले. तर ८० हजारांवर बाधितांची संख्या झाली. हिंदू प्रेतांना मुस्लिम बांधवांनी दिलेला अग्नी हे नवे सामाजिक सलोख्याचे चित्र उपराजधानीत दिसत होते. ही बाब सामाजिक ऐक्याला चालणा देणारी आहे. 

इतर आजारांचे रुग्ण हरवले - 
कोरोनामुळे लॉकडाउन झाले. शहरातील खासगी रुग्णालये बंद होती. यामुळे इतर आजारांचे रुग्ण दिसून आले नाही. विशेष असे की, शहरातील प्रदूषण थांबले. हॉटेलमध्ये जाऊन ताव मारण्याचे प्रमाण शून्य होते. इतर आजारांच्या रुग्णांचा टक्का कमी झाला होता. 

मेडिकलमध्ये पहिले कोविड हॉस्पिटल - 
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पहिले कोविड हॉस्पिटल (ट्रॉमा) तयार करण्याचा मान मेडिकलने पटकाविला. त्यापाठोपाठ मेयोत (सर्जिकल कॉम्प्लेक्स) कोविड हॉस्पिटल तयार झाले. एम्समध्येही कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. याशिवाय मेडिकलमध्ये तीन अतिदक्षता विभागाचे काम पूर्ण झाले. 

कोरोनाने थांबवले प्रकल्प - 

  • नागपूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम थांबले. 
  • दंत महाविद्यालयात सुपर स्पेशालिटीचे काम थांबले. 
  • मेडिकलमध्ये पहिल्यांदा देहदानाचा टक्का घसरला. 
  • सुपरच्या हृदय प्रत्यारोपण प्रकल्प रखडला. 
  • फुप्फुस संशोधन संस्थेचा प्रकल्प थंडबस्त्यात. 
  • मेडिकलमधील दिव्यांग कंपोझिट सेंटर थंडबस्त्यात. 
  • इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड हेल्थ सेंटर थंडबस्त्यात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com