सावधान..! कोरोनाची दुसरी लाट पसरतेय? मेडिकल, मेयोसह दंत रुग्णालयातच बाधित डॉक्टरांचा समावेश

corona patients increases in nagpur
corona patients increases in nagpur

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) तसेच शासकीय दंत महाविद्यालयीन रुग्णालयात चाळीसच्या वर निवासी डॉक्टर, एमबीबीएस विद्यार्थी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट असून केवळ नागपुरात नव्हेतर विदर्भात दिसून येत आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ येथे प्रशासनाने गर्दी आढळून आल्यास थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नागपूरचे प्रशासन अद्याप कारवाई करण्यापासून दूर आहे. मात्र, कोरोनाची ही लाट वेगाने पसरण्याचा धोका आहे. 

नागपुरातील मेडिकल, मेयो, दंत रुग्णालयात बाधित डॉक्टरांचा समावेश असल्यामुळे नियमित वर्ग तसेच प्रात्यक्षिक वर्ग सद्यःस्थितीत बंद करण्यात आले आहे. शहरात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या गृहीत धरुन विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करावी लागणार असल्याचे वैद्यक तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. सध्या नागपुरात कोरोना चाचणींची गती वाढवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात यावे. यासाठी वस्ती स्तरावर मोबाईल प्रयोगशाळा तयार करण्यात यावी. येत्या मार्चपासून पुन्हा सणासुदीचा काळ येणार आहे. यामुळे आजपासूनच सतर्कता पाळली जावी. शहरात सरासरी सहा ते सात हजार चाचण्या करण्याची गरज आहे. सद्या चाचण्यांचा वेग मंदावला आहे. 

ट्रेसिंग थांबले -
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील वीस ते पंचवीस व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत होते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्णतः थांबले आहे. यामुळेच कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या स्थितीत सिटीबसचे चालक, वाहक आणि एसटी महामंडळाचे चालक, वाहक यांची कोरोना चाचणी प्राधान्याने करण्यात यावी. त्याशिवाय किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल चालक, वेटर्स, दूध विक्रेते, मोलकरीण, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, नळ जोडणी करणाऱ्या व्यक्ती, लाँड्रीचालक, ऑटोचालक यांची चाचणी करण्यात यावी, जेणेकरून संक्रमण रोखण्यास मदत होईल. 

कोरोनाचा धोका वाढला, ५९६ जण कोरोनाबाधित -
मागील आठवडाभरापासून दर दिवसाला कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढताच पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. बुधवारी ७ हजार ५६७ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील ५९६ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका हद्दीतील ४९९ जणांना बाधा झाली आहे. तर ९५ जण ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय जिल्ह्याबाहेरचे दोन जण आहेत. तर आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एक जण शहरातील तर दोन जण ग्रामीण भागातील आहेत. दोघे जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ४० हजार ३८४ कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर २७९ जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख ३१ हजार ४२० झाली आहे. आतापर्यंत कोरोना मृतांची संख्या ४ हजार २४७ झाली आहे. तर आतापर्यंत ११ लाख ३७ हजारापेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. 

सात पोलिसांना कोरोना -
लसीकरण मोहीम सुरू असतानाच बुधवारी सात पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने विभागात खळबळ उडाली आहे. नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांची चौकशी करताना सुरक्षित अंतराचे पालन करणे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाधितांमध्ये दोन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले होते, अशी माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com