५१ वर्षीय रुग्णाच्या हृदयाची फाटली नस; दुसरीकडे अहवाल आला पॉझिटिव्ह

प्रशांत रॉय
Tuesday, 10 November 2020

रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सुपर स्पेशालिटीच्या सीवीटीएस विभागाला त्वरित शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. कोरोना सकारात्मक असतानाही विभागाचे प्रमुख डॉ. सतीश दास यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू केली.

नागपूर : एका ५१ वर्षीय रुग्णाच्या हृदयातील नस फाटल्यामुळे सोमवारी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतु, सदर रुग्णाचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने डॉक्टरांनी सतर्कतेने काम केले. या प्रक्रियेत जवळपास ११ तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येते.

रुग्णाला हृदयविकाराच्या समस्येमुळे कुटुंबीयांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तेथे सुविधा नसल्यामुळे रुग्णाला नागपुरात रेफर केले. जेव्हा रुग्णाला मेडिकलमध्ये भर्ती करण्यात आले व तिथे त्यांची तपासणी केली असता अहवाल सकारात्मक आला. रुग्णाच्या हृदयाची नस फाटल्याने शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे झाले होते. या शस्त्रक्रियेला बेनटॉज प्रोसिजर असे संबोधल्या जाते. हा दुर्मीळ आजार आहे.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सुपर स्पेशालिटीच्या सीवीटीएस विभागाला त्वरित शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. कोरोना सकारात्मक असतानाही विभागाचे प्रमुख डॉ. सतीश दास यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू केली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही शस्त्रक्रिया सुरू झाली. सर्व डॉक्टर पीपीई किट व इतर आवश्यक साहित्यांसह तयार झाले.

ही शस्त्रक्रिया सकाळी जवळपास ४ वाजतापर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात येते. यात विभागातील डॉ. अमरीन शेख, कुणाल रावेकर, डॉ. कल्पेश अग्रवाल, डॉ. प्रणय म्हैसारे, डॉ. योगेश झंवर यांच्यासह परिचारिकांनी सहभाग घेतला आहे. या कोरोनाकाळात या विभागातील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

नातेवाइकांचे डॉक्टरांसोबत उडाले खटके!

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधिताच्या हृदय शस्त्रक्रियेला घेऊन रुग्णाचे नातेवाईक व संबंधित विभागाच्या डॉक्टरांमध्ये सोमवारी अचानक वाद झाल्याने खळबळ उडाली. नातेवाइकांनी एका लोकप्रतिनिधीकडे तक्रारही केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona postitive patient bypass surgery