विदर्भात कोरोना दाखल : नागपुरात आढळला पहिला रुग्ण, या देशातून झाली लागण

corona patient
corona patient

नागपूर : कोरोना विषाणूचे रुग्ण आढळणाऱ्या चीनसह इटली, दुबई, सौदी अरेबिया, थायलंड, अमेरिका व इतर देशातून विविध कामानिमित्त 76 जण आजपर्यंत नागपूरात आले आहे. यातील पाच दिवसांपुर्वी अमेरिकेतून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या उपकेंद्राद्वारे (मेयो) बुधवारी देण्यात आला. सध्या मेयोत या रुग्णावर उपचार सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारपर्यंत 604 जणांची तपासणी थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. 

पश्‍चिम नागपुरातील कोरोनाग्रस्त आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे येताच नागपुरची आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र कावळे यांनी तत्काळ मेडिकल, मेयोचे अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांची संयुक्त बैठक घेऊन प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. पुणे येथे कोरोनाचे विषाणू आढळलेले पाच रुग्ण सापडले. यारुग्णासोबत एकाच विमानात दुबई ते भारत प्रवास केलेले तिघे जण नागपुरातील आहेत.

मेडिकलमध्ये 4 कोरोना संशयित दाखल 
 तिघेही एकाच कुटुंबातील असून तिघांपैकी एक मुलगा पुण्यात थांबला आहे. तर नागपुरात आलेल्या त्याच्या आई-वडिलांवर आरोग्य विभागाचे पथक त्यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या विलगिकरण कक्षात लक्ष ठेवून आहे. तर उपराजधानीतील मेडिकलमध्ये संशयित कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून ती चारवर पोहचली आहे. यामुळे आयसोलेशन वॉर्डातील खाटांची संख्या वाढवण्यात आली. 40 खाटाचा वॉर्ड तयार केला. याशिवाय दुसरा 32 खाटांचा वॉर्ड तयार करण्याची सुचना मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिली. 


विदर्भात 76 प्रवाशांचा आरोग्य विभागाकडून पाठपुरावा 
पुण्यात कोरोनाचे विषाणू आढळलेल्या दांपत्यासोबत दुबई ते भारत असा एकाच विमानात या तिघांनीही प्रवास केला होता. पुण्याच्या दांपत्याला कोरोनाची लागण असल्याचे पुढे येताच केंद्र सरकारने या विमानातील सर्व प्रवाशांची नावे तातडीने जिल्ह्‌यातील आरोग्य यंत्रणेला पाठवली. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभाग त्यांच्यावर सलग 14 दिवस लक्ष ठेवणार आहे. इतरांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. या दांपत्याने मेडिकलला दाखल व्हावे, तपासणी करावी, असे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. इटली, दुबई, सौदी अरेबीया, जर्मनी या देशांमध्ये प्रवास करणारे वेगवेगळे 4 कोरोना संशयीत रुग्ण मेडिकलमध्ये भरती असून आतापर्यंत 10 संशयितांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होती, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. एक व्यक्ती जर्मनीचा नागरिक नागपुरमार्गे ताडोबा जंगलात पर्यटनासाठी आला होता. सर्दी, खोकला, तापासह इतर करोनाची लक्षणे आढळताच आरोग्य विभागाला खबर पोचवण्यात आली. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या रुग्णाला तातडीने उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केले. तज्ज्ञांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. 

विदर्भात 21 जणांवर आरोग्य पथकाची नजर 
कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या चीनसह इटली, दुबई, सौदी अरेबिया, थायलंड व इतर देशातून विविध कामानिमित्त 76 जण आजपर्यंत नागपूरात आले. यापैकी एक व्यक्ती अद्यापही आरोग्य विभागाच्या आरोग्य पथकाला गवसला नाही. हा व्यक्ती कुठे आहे, याचा शोध घेण्यात आरोग्य विभाग नापास झाला. 65 जणांवर आरोग्य विभागाकडून 14 दिवस लक्ष ठेवण्यात आले होते. 14 दिवस कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने आता पाठपुरावा बंद झाला. सध्या विदर्भातील 10 जिल्ह्यांमध्ये 21 जणांवर सध्या आरोग्य पथकाची नजर आहे. यातील एक व्यक्ती जर्मनीचा नागरिक नागपुरमार्गे ताडोबा जंगलात पर्यटनासाठी आला होता. सर्दी, खोकला, तापासह इतर करोनाची लक्षणे आढळताच ही सूचना आरोग्य विभागाला काहींनी दिली. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या रुग्णाला तातडीन उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलला दाखल केले. सध्या तज्ज्ञांच्या देखरेखीत त्यावरही उपचार सुरू आहे. तर इतर एका विदेशात काही कामानिनित्त जावून आलेल्या रुग्णाच्या आजाराची माहिती गुरूवारी तपासणी अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. 

32 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड 
बुधवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी कोरोना आजारासंदर्भात बैठक घेतली. त्यात तातडीने येथील खाटांची संख्या 7 वरून वाढवून 40 करण्यात आली. याशिवाय एक 32 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. मेडिकलमध्ये सध्या 4 व्हेंटिलेटरसह आवश्‍यक औषधांचा साठा उपलब्ध आहे. तर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर 6 मार्च ते 11 मार्चच्या दुपारपर्यंत विदेशातून आलेल्या विविध विमानातून आलेल्या 604 प्रवाश्‍यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले, अशी माहिती आरोग्य उपसंचालकांनी कळविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com