सावधान! तुम्हालाही आली का कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी लिंक; थांबा थांबा

Corona vaccine on the target of cyber criminals Nagpur crime news
Corona vaccine on the target of cyber criminals Nagpur crime news

नागपूर : राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात होताच सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. लसीकरणाच्या नोंदणीसाठी फोन करून ॲप डाऊनलोड करण्यास सांगून किंवा लिंक पाठवून अनेकांना जाळ्यात ओढत आहेत. लिंकवर क्लिक केल्यानंतर फॉर्म भरण्यास सांगितले जात आहे. त्यामध्ये व्यक्तीचे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि बॅंकेची माहिती भरण्यास सांगण्यात येत आहे. माहिती भरल्यानंतर आपले बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या फळीत कर्तव्य बजावणारे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू आहे. सामान्य नागरिकांसाठी अद्याप लसीकरणाची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. परंतु, सायबर क्रिमिनल्सने ही बाब हेरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या नावावर अनेकांना मोबाईल लिंक पाठवणे सुरू केले आहे.

नोंदणी केलेल्यांनाच कोरोना लस देण्यात येईल, अशी अफवासुद्धा पसरली आहे. त्यामुळे अनेक जण लिंकवर क्लिक करीत आहेत. लिंकवर क्लिक करताच फार्म भरण्यास सांगण्यात येते. त्यामध्ये व्यक्तीचे पॅन कार्ड, आधारकार्ड आणि बॅंकेची डिटेल्स भरण्याच्या सूचना दिली जातात. हा फार्म भरल्यानंतर सायबर गुन्हेगार बॅंकेचे खाते रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू करतात. अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांनी नव्याने फंडा तयार केला असून अनेकांना गंडा घालणे सुरू केले आहे.

सरकारच्या आधीच गुन्हेगार सक्रिय

लसीकरणाच्या माहितीसाठी 'CO-WIN' (Winning over COVID) हे ॲप येणार असून ते गुगलच्या स्टोरवर डाऊनलोड करता येणार आहे. सरकारने या ॲपची अधिकृत घोषणा केली आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठीची लिंक सरकारकडून सर्वत्र पाठवली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिल्यानंतर सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत.

शासनाकडून लिंक देण्यात आलेली नाही
कोरोना लस नोंदणीसाठी खासगी मोबाईल फोन/मेसेज/व्हॉट्सॲपवरून शासनाकडून लिंक देण्यात आलेली नाही. सध्या अशी कोणतीही नोंदणीसुद्धा सुरू नाही. त्यामुळे कुणीही आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. तसेच कोरोना लसीकरणासाठी कोणताही ऑनलाइन फार्म ज्यामध्ये बँकेशी संबंधित माहिती भरू नये. मॅसेजमध्ये येणारी लिंक फसवी असू शकते. खात्री केल्याशिवाय अशा मॅसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com