‘नीट'चे नेटके नियोजन; उद्या परीक्षा, केंद्रावर जाताना काय घ्यावी काळजी, वाचा सविस्तर

Corona's fear in National Eligibility Entrance Test (NEET)
Corona's fear in National Eligibility Entrance Test (NEET)

नागपूर : एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) १३ सप्टेंबरला घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट' (नीट) परीक्षेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षी काहीना काही विघ्न येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत २५ हजारांवर विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र आणि केंद्राची संख्या वाढवून एनटीएने यंदा बरेच नीटनेटके नियोजन केल्याचे दिसून येते. दुपारी २ ता ५ या दरम्यान पेपर घेण्यात येणार असून १.३० वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करावे लागणार आहे.

दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी "नीट' परीक्षा घेण्यात येते. दोन वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईईनंतर देशातील सर्वात मोठी परीक्षा असल्याने येत्या १3 सप्टेंबरला वैद्यकीय प्रवेशांसाठी आवश्यक असलेल्या नीट प्रवेश परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. यात शहरात ६४ केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर ३६० ते ४२० म्हणजे जवळपास २५ हजारांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल.
 

बीकेव्हीव्हीऐवजी ऑर्चिड पब्लिक स्कूल

‘नीट' परीक्षा घेण्यासाठी देण्यात आलेले शहरातील भारतीय कृष्णा विद्या विहार हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी काटोल येथील नबीरा महाविद्यालयाजवळील ऑर्चिड पब्लिक स्कूल हे केंद्र ठेवण्यात आले आहे. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे विद्यार्थ्यांना फोन, ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. मात्र, वेळेवर केंद्रात बदल करण्यात आल्याने नागपूरमधील विद्यार्थ्यांना काटोलला जावे लागणार आहे. या प्रकाराने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.


एका वर्गखोलीत १२ विद्यार्थी

प्रत्येक वर्गखोलीत एका निरीक्षकाच्या देखरेखीखाली केवळ १२ विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर हात धुण्यासाठी ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर, साबणाची व्यवस्था करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. संसर्गामुळे यंदा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी केंद्रावर एकमेकांपासून कमीत कमी सहा फूट जागा राखणे आवश्यक केले आहे.
 

परीक्षेपूर्वी 'थर्मल स्कॅनिंग'द्वारे तपासले जाणार

केंद्र कर्मचाऱ्यांनी केलेल्या 'थर्मल स्कॅनिंग'मध्ये उमेदवाराच्या शरीराचे तापमान 'कोव्हिड-१९' मानदंडापेक्षा जास्त असेल, तर विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत किंवा वेगळ्या कक्षात बसविले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर आसन क्षेत्राची स्वच्छता केली जाणार आहे. सर्व दारांचे हँडल, जिना रेलिंग, लिफ्टची बटणे यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी सर्व मार्गदर्शक सूचना 'एनटीए'ने आपल्या संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे सविस्तर जाहीर केल्या आहेत.
 

गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सेंटर

नीट परीक्षेदरम्यान दरवर्षी केंद्रावर मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही गर्दी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये २ हजार ५४६ केंद्र होती. मात्र, त्यात वाढ करून ३ हजार ८४३ केंद्र देशभरात वाढविण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तालुका पातळीवर केंद्राची सोय करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळाला आहे.

केंद्रावर जाताना घ्या ही काळजी

परीक्षेसाठी फेरमूल्यांकनाची सोय उपलब्ध नसून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्राची व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रावर पेन्सिल बॉक्‍स, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, मोबाईल, इलेक्‍ट्रीक गॅझेट आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय मुलांना सुती कपडे, हाफ शर्ट वा टी-शर्ट घालून जावे लागणार आहे. मुलींनीही हेअरपीन, ब्रेसलेट वा गळ्यात चेन घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रावर येताना जोडे घालून येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र, मधुमेही विद्यार्थ्यांना शुगर टॅबलेट, हॅन्ड बॅग, फळ आणि पारदर्शी बॉटल नेता येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहचावे लागणार आहे.
लालपरीही सज्ज

नीट परीक्षेसाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र आहेत. यामुळे बसस्थानकांवर गर्दी होण्याची तशी शक्यता नाही. पण, विद्यार्थी आल्यास ते परीक्षेपासून वंचित राहू नयेत यादृष्टीने एसटी महामंडळाने तयारी केली आहे. नेहमीच्या महत्वाच्या मार्गांवर अधिकच्या फेऱ्यांचे नियोजन करण्याच्या सूचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सोबतच विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता तालुका स्तरावरून अधिकच्या बसेस सोडण्यासाठी नियोजन करून ठेवण्यास सांगण्यात आल्या आहेत. गरजेनुकार तालुका व आंतरजिल्हा फेऱ्या सोडण्यात येणार आहे. त्यासाठी १५ ते २० अधिक बसेस तयार ठेवण्यात येतील, गरज भासल्यास फेऱ्यांची संख्या वाठविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

७२० गुणांचे प्रश्‍न

एनटीएद्वारे नुकतेच प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहेत. ७२० गुणांची परीक्षा असून यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयांचे १८०-१८० गुणांचे ४५-४५ प्रश्‍न विचारण्यात येतील. जीवशास्त्र विषयात ३६० गुणांचे ९० प्रश्‍न विचारण्यात येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com