
गेल्या वर्षभरापासून शहरात विकास कामांना ब्रेक लागला आहे. तुकाराम मुंढे यांनी महापालिकेकडे पैसा नसल्याने विकास कामे रोखण्याचे धोरण अवलंबविले होते. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही मुंढे यांचेच धोरण स्वीकारले. त्यामुळे शहरात विकास कामे बंद आहे. कार्यादेश झालेली विकास कामे बंद असल्याने नगरसेवक संतप्त आहेत.
नागपूर ः महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विकासकामे थांबविल्याने पुढील मनपा निवडणुकीत जनतेपुढे कसे जायचे? असा पेच नगरसेवकांपुढे आहे. मात्र, आता महामार्ग प्राधीकरण तसेच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या भूमीपूजन, लोकार्पणामुळे नगरसेवकांना काहीसा दिलासा मिळाला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने केलेली कामे नगरसेवकांना जनतेपुढे जाण्यासाठी मोठा आधार ठरणार आहे.
गेल्या वर्षभरापासून शहरात विकास कामांना ब्रेक लागला आहे. तुकाराम मुंढे यांनी महापालिकेकडे पैसा नसल्याने विकास कामे रोखण्याचे धोरण अवलंबविले होते. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही मुंढे यांचेच धोरण स्वीकारले. त्यामुळे शहरात विकास कामे बंद आहे. कार्यादेश झालेली विकास कामे बंद असल्याने नगरसेवक संतप्त आहेत.
हेही वाचा - असाही एक अवलीया... जमीन दान करून केले गरिबांचे स्वप्न पूर्ण; थाटला दहा बेघरांचा संसार
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या विनंतीनंतर काही कामे सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले असले तरी यासाठी त्यांनी तीन सदस्यीय समिती तयार करण्याचा निर्णय घेतला. कामे सुरू करायची तर त्यात समिती कशाला? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर विकास कामे टाळण्याचाच हा प्रकार असल्याचा समज अनेक नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे मागील वर्षभर तसेच पुढील वर्षातही विकास कामांची अपेक्षाच नगरसेवकांना नाही. त्यामुळे आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने केलेल्या कामातूनच जनतेपुढे जाण्याचा निर्धार सत्ताधारी नगरसेवकांनी केला आहे.
विशेष म्हणजे आज केंद्रीय मार्ग निधीतून तयार करण्यात आलेल्या वंजारीनगर जलकुंभ ते अजनी रेल्वे स्टेशन रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय जरीपटका येथे केंद्रीय मार्ग निधीतून तयार होणाऱ्या पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. याशिवाय उद्या आउटर रिंग रोडच्या लोकार्पणाचा सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांत भूमीपूजन व लोकार्पणाचे तीन कार्यक्रम असल्याने नगरसेवकांत उत्साह संचारला आहे. आता याच कामांच्या बळावर पुढील मनपा निवडणुकीत जनतेपुढे जायचे, शेवटी ‘साहेबांचाच आधार मिळाला`, अशी चर्चा नगरसेवकांत रंगली आहे.
नक्की वाचा - डॉ. होमी जहॉंगीर भाभा पुण्यतिथी विशेष: भारताचे ‘लिओनार्दो दा विंची‘ बैठकीसाठी आले...
मार्गदर्शक नसल्याचीही अनेकांची खंत
निवडणुकीचे वर्ष बघता ज्येष्ठ नगरसेवकांकडून विकास कामे सुरू करण्याबाबत पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शनाची गरज आहे. परंतु पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर महापालिकेकडे एकही ज्येष्ठ नगरसेवक फिरत नसल्याने कुणाकडून सल्ला घ्यायचा, असा सवालही काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ