अरे देवा, कापूस खरेदीला अचानक लागला "ब्रेक', कारण काय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

बुधवारी सकाळपासूनच पावसाने रिपरिप लावल्यामुळे अनेक कापसाच्या गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. पण, सायंकाळी अचानक मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी आठपर्यंत येथील खरेदी केंद्रावर तब्बल 23 गाड्या उभ्या होत्या. त्या आज ओल्या झाल्या. जलालखेडा येथील कापूस खरेदी केंद्रावर असलेल्या ग्रेडरकडून कापसाचा ओलावा योग्य प्रकारे व शेतकऱ्यांना न दाखवता घेण्यात येत असल्याची अनेकांची ओरड आहे.

जलालखेडा (जि.नागपूर):  आधीच कासवगतीने सुरू असलेल्या कापसाच्या खरेदीला वारंवार "ब्रेक' लावण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे हवामान खात्याने पावसाचा "अलर्ट' जाहीर केला, तर दुसरीकडे नरखेड तालुक्‍यात कापसाच्या शासकीय खरेदीला "ब्रेक' दिला. आता ही खरेदी किती दिवस बंद राहणार, हा खरा प्रश्न आहे.
नक्‍की हे वाचा : नोंदणीक्रमांक 2676, दिवस लागतील तीस, सांगा बांधवांनो, काय करायचे...

कापूस घरीच सडण्याची चिंता
खरीप हंगाम तोंडावर असतानादेखील त्याचा मागील हंगामातील कापूस अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आता पावसाळा असल्यामुळे पाऊस राहणारच, त्यामुळे अशीच कापूस खरेदी बंद राहिली तर शेतकऱ्यांचा कापूस घरीच राहण्याची किंवा कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : कुख्यात रोशन शेख गॅंगवर मोक्‍का

बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप
बुधवारी सकाळपासूनच पावसाने रिपरिप लावल्यामुळे अनेक कापसाच्या गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. पण, सायंकाळी अचानक मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी आठपर्यंत येथील खरेदी केंद्रावर तब्बल 23 गाड्या उभ्या होत्या. त्या आज ओल्या झाल्या. जलालखेडा येथील कापूस खरेदी केंद्रावर असलेल्या ग्रेडरकडून कापसाचा ओलावा योग्य प्रकारे व शेतकऱ्यांना न दाखवता घेण्यात येत असल्याची अनेकांची ओरड आहे. आजपर्यंत नरखेड तालुक्‍यात असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर फक्त दोन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. कापूस विक्रीसाठी सात हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाली आहे. अजूनही पाच शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होणे बाकी आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. खरेदी वारंवार बंद करण्यात येत आहे. अशात पाच हजार कापसाची खरेदी होणार की नाही, असा प्रश्‍न आहे.

हेही वाचा : मी टिव्ही बोलतोय, तब्बल तीन महिन्यांनी एक दिवसासाठी झालो "कोरोनामुक्‍त', कसं वाचा...

जास्तीत जास्त खरेदीचा प्रयत्न
शेतकऱ्यांच्या समोरच त्यांच्या कापसाचा ओलावा तपासला जात आहे. जास्त कापूस खरेदी करण्यात येत असल्याने त्याच दिवशी शेतकऱ्यांना बिल देणे अवघड होते. तसेच कापसाच्या ग्रेडनुसारच भाव भरण्यात येत आहे. अद्यापही कोणी शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. शेतकऱ्यांचा कापूस जास्तीत जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न आहे.
दिलीप कांबळे, ग्रेडर, सीसीआय कापूस खरेदी केंद्र, जलालखेडा

पावसाचा जोर राहिला तर खरेदी बंद
हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. म्हणून बुधवारी कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढे पण एक दोन दिवस कापूस
खरेदी बंद राहू शकते. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तहसीलदारांमार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे खरंच कापूस आहे का, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सतीश येवले, सचिव, नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cottan purcheses closed