रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केली कीटकनाशकांची फवारणी, पण झाले उलट

मनोहर घोळसे
Thursday, 15 October 2020

शेतकऱ्याने महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र, फवारणीनंतर अवघ्या तीन-चार दिवसातच विपरीत परिणाम होऊन त्यांच्याकडील अकरा एकर शेतातील कापसाचे पीक जळाले.

सावनेर (जि. नागपूर):  तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस पिकाला नगदी पीक म्हणून पहिली पसंती दर्शवित कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यापाठोपाठ सोयाबीन, मका व इतर पिकांचीही लागवड केली. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. मात्र, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची आस बाळगून पीक वाचविण्यासाठी महागडे खते, कीटकनाशकांचा वापर केला. त्यामुळे कापूस जळाल्याच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

सावळी परिसरात दिलीप मोहोतकर यांच्या शेतात असाच प्रकार घडला. सावळी मोहोतकर येथील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याने ११ एकर शेतात कापसाची लागवड केली. पीक हाती येण्याअगोदरच नैसर्गिक कारणांमुळे कापसाचे पानं, फुले, बोंडे यावर रोग आला. त्यामुळे शेतकऱ्याने महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र, फवारणीनंतर अवघ्या तीन-चार दिवसातच विपरीत परिणाम होऊन त्यांच्याकडील अकरा एकर शेतातील कापसाचे पीक जळाले. रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदारांनी दिलेले व त्यांच्या सल्ल्यानुसार फवारणी केल्याने असा प्रकार घडल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - निराधारांना तीन महिन्यांपासून 'आधार'च नाही, निधी अडकल्यानं उपासमारीची वेळ

पिकांच्या बाबतीत बियाणे, खते व फवारणी औषधांच्या वापरासाठी नेहमीच सजग असावे. वारंवार कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. 
- गोविंदा ठाकरे, पंचायत समिती सदस्य 

पीकविमा कंपनीतर्फे नुकसान भरपाई द्या - 
मौदा तालुक्यात ७ ऑक्टोबरला आलेल्या अवकाळी पावसामुळे मौदा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे १३ ऑक्टोबरला उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार प्रशांत सांगडे व कृषी विभाग यांना निवेदन देण्यात आले. 

मौदा तालुक्यातील धानाच्या पिकाचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे झालेले आहेत. तसेच सर्व शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून पीक कर्ज घेतले. पीककर्ज देतेवेळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकेने सर्व शेतकऱ्यांच्या पीक कर्ज बँक खात्यातून पीक विम्याच्या रकमेची कपात सुद्धा केली आहे. पीक विम्याची सर्व रक्कम आता विमा कंपनीच्या खात्यात जमा झाल्यामुळे प्रशासनाने तत्काळ मौदा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे संबंधित पीक विमा कंपनीला पाठवून पीक विमा कंपनीमार्फत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे. 

हेही वाचा - उत्कंठा ताणली जात असताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आप २५ लाख की धनराशी जीत चुके है’

पिकनुकसान पाहणी दौरा - 
अतिपावसामुळे नगरधन-भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कलच्या गावामधे धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. याची दखल नगरधन-भंडारबोडीचे जि.प. सदस्य दुधरामजी सव्वालाखे यांनी घेतली. बुधवारी(ता.१४)त्यांनी पिकाची पाहणी करुन पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी पीक पाहणी दौरा केला. या दौऱ्यात जि.प.अध्यक्ष रश्मि बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जि.प.सदस्य दुधरामजी सव्वालाखे, सभापती कला ठाकरे, पं.स. सदस्य शंकर होलगिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग उपस्थित होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton in 11 acre farm is burn due to pesticides in saoner