विक्रीकेंद्रावरून परत केला जातो कापूस, शेतकऱ्यांच्या "साडेसाती' मागचे कारण काय,...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

कापसाचे संथगतीने होत असलेल्या जिनिंग व प्रेसिंगमुळे खरेदी केंद्रावर कापूस खाली करण्यासाठी जागा नाही. तसेच तयार गाठी उचल्या जात नसल्यामुळे देखील गाठी ठेवायला जागा नाही. यामुळे केंद्रावर दोन तीन दिवस खरेदी बंद राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. तसेच खरेदी संथगतीने सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांचा गाड्या दोन-तीन दिवस केंद्रावर उभ्या राहत असल्यामुळे याचा भुर्दंड शेतकऱ्यांवर बसत आहे.

जलालखेडा (जि.नागपूर) : यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी कमालीचा जेरीस आला आहे. त्यामागे लागलेली "साडेसाती' काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. शासनाच्या खरेदी केंद्रावर त्याचे हाल सध्या सुरु आहेत. त्याच्या कापसाला एक तर भाव मिळत नाही तर दुसरीकडे त्याचे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्यासाठी दोन दोन दिवस लागत आहे. यामुळे शेतकरी एकीकडे शेतीची कामे करावी की कापूस विकण्यासाठी रांगेत राहावे, अशा दुहेरी मानसिकतेत सापडला आहे.

आणखी वाचा : आरटीई प्रवेश : चुकीची कागदपत्रे देत असाल तर खबरदार

शेतक-यांना विनाकारण फिरविले जाते
सध्या नरखेड तालुक्‍यात शेतकऱ्यांना त्याचा मगील खरीप हंगामाचा कापूस विकण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. नरखेड तालुक्‍यात सीसीआयचे दोन तर पणन महासंघाचे एक असे तीन शासकीय कापूस खरेदी केंद्र आहे. याठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशांचा कापूस खरेदी करणे सुरु आहे. शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी त्यांचा कापूस आणण्यासाठी फोनवरून सुचना देण्यात येत आहे. पण केंद्रावर कापूस नेल्यानंतर त्याचा कापूस दोन दोन दिवस खरेदी करण्यात येत नाही. तसेच अनेक वेळा तर जागा नसल्यामुळे त्याला दुस-या लांबच्या केंद्रावर पाठविले जाते. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. अजूनही तालुक्‍यात हजार क्विंटल कापसाची खरेदी होणे बाकी आहे. अशात पावसाळा सुरु झाल्यामुळे वाढलेल्या आदर्तामुले त्याच्या कापसाला भाव देखील कमी मिळत आहे.

हेही वाचा : नागपुरात कोरोना सुसाट

"ग्रेडर' शी होतो वाद
शासकीय खरेदी केंद्रावर कापूस नेला तर त्याचा कापूस शासन खरेदी करेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. पण केंद्रावर त्याचा कापूस चांगला नसल्याचे कारण दाखवित "ग्रेडर' काही कापूस परत करीत आहे. सुरुवातीपासून वेचणी केलेला कापूस असल्यानंतरही त्याच कापूस केंद्रावरून परत होत असल्यामुळे तो कापूस त्याला खासगी व्यापाऱ्याला चार हजार रुपयांच्या भावाने विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सध्या या केंद्रावर सुरु आहे. याबाबत शेतकरी "ग्रेडर' शी बोलत असल्यामुळे वाद देखील होत असल्याचे चित्र तालुक्‍यात आहे. हाच परत केलेला कापूस व्यापारी खरेदी करून त्यांच्या विश्वासातील शेतकऱ्यांच्या नावाने टाकत आहे व कसा स्वीकारला जात आहे, असा प्रश्न पिडीत शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा : पारशिवनीत नळातून येते पिवळे पाणी, कोण खेळत आहे नागरिकांच्या जिवाशी

कापूस खरेदीत गोैडबंगाल
नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी व्हावा यासाठी नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नोंदणी करण्यात आली. याच प्रतीक्षे यादीप्रमाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी बोलविण्यात येत आहे. पण तरी मात्र काही कापूस खरेदी केंद्रावर या व्यतिरिक्त अन्य लोकांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. हे सर्व गोैडबंगाल रात्रीच्या अंधारात सुरु आहे. यात मोठे मासे सहभागी असल्याची चर्चा सध्या तालुक्‍यात सुरु आहे. सर्वच खरेदी केंद्रावरील दररोज होणा-या बिलाची तपासणी केली तर प्रतीक्षा यादीत नसलेल्यांचा परजिल्ह्यातील लोकांचा कापूस खरेदी करण्यात येत असल्याचे उडकीस येईल. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सोळा क्विंटल कापूस घरी पडून आहे.
आता कुठे नंबर आल्यामुळे सुरुवातीपासून घरी आलेला सर्व कापूस घेऊन खरेदी केंद्रावर नेला. मेंढला येथील असल्यानंतर जलालखेडा खरेदी केंद्रावर कापूस नेला, पण तेथे जागा नसल्यामुळे लांब मोगरा खरेदी केंद्रावर कापूस पाठविला. तेथे कापूस खरेदी करताना काही कापूस खाली केला तर 16 क्विंटल कापूस चांगला नसल्याचे कारण सांगून तो परत केला. यामुळे आता हा सोळा क्विंटल कापूस घरी पडून आहे.
मनोज कनेरे
शेतकरी, मेंढला

नुकसान होताना कोणी बोलत नाही
जलालखेडा येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस नेला. 48 क्विंटल कापूस खाली करण्यात आला. तर क्विंटल कापूस खराब असल्याचे सांगून खाली केला नाही. दोन दिवस ग्रेडरची विनंती केली पण कापूस खाली केला नाही. काही बोलणे की पोलीस बोलाविण्याची धमकी देण्यात येते. शेवटी तोच कापूस खासगीत 4500 रुपयांच्या भावाने विकला. यात800 रुपये क्विंटलचे नुकसान झाले. तसेच यासाठी हजार रुपये खर्च झाला तो वेगळा. शेतकऱ्यांचे असे नुकसान होत असतानादेखील कोणी काही बोलत नाही, याचे आश्‍चर्य वाटते.
अजय कळंबे
शेतकरी, जलालखेडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton is returned from the outlet