कोविड-19 मुळे काय बदलले, मानवी जीवनावर काय परिणाम झाला... जाणून घ्या संशोधन प्रबंधातील महत्त्वपूर्ण बाबी

Covid-19 caused economic stress
Covid-19 caused economic stress

नागपूर : कोविड-19 चे अनेक दूरगामी परिणाम भारतीय समाजावर झाले असून 80 टक्‍के लोकांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे. तसेच या कालावधीत सामाजिक दुराव्यामुळे जवळपास 50 टक्‍के लोकांना मानसिक ताण आणि चिंतांना सामोरे जावे लागले, असे निष्कर्ष संशोधन प्रबंधात पुढे आले आहेत. 

व्हीएसपीएम दंत महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या ओरल पॅथॉलाजी विभागातील डॉ. रोहित मोहरील व डॉ. अल्का दिवे यांनी "कोविड-19 चा भारतीय जीवनशैलीवरील प्रभाव- एक प्रातिनिधिक नमूना अभ्यास' या विषयावरील संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. अभियंते, डॉक्‍टर, व्यापारी, फार्मसिस्ट, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील मंडळीना या संशोधनामध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.

एकूण 518 जणांच्या अभ्यासाअंती असे लक्षात आले की, अनेक लोक हातांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रियेबाबत महामारी पूर्वीच्या काळापेक्षा आता अधिक जागरुक झाले आहेत. जवळपास 50 टक्‍के लोकांना या महामारीच्या काळात नियमित औषधी व आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधण्यास अडचणींचा सामना करावा लागला.

या संशोधनातून निष्पन्न झालेली अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जवळपास 80 टक्‍के लोकांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागला. अनेक जण नोकरी-व्यवसायात असुरक्षितता अनुभवत आहेत, असेही मत अभ्यासकांनी नोंदवले आहे. 
यापुढे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमही पूर्वीसारखे मोठ्या प्रमाणावर होणार नाहीत. पूर्वीच्या तुलनेत लोक आता डिजिटल देय माध्यमाला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया पुढाकाराला चालना मिळू शकेल.

हा अभ्यास शासनाच्या धोरण आखणाऱ्यांसाठी व भारतातील व्यापाऱ्यांसाठी रोजगारासंदर्भातील नियमात सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कोविड-19 संपल्यानंतर सामाजिक आराखडा ठरविण्यासाठी या अभ्यासाचा आधार मिळू शकेल, असे मत या प्रबंधाच्या अभ्यासकांनी नोंदवले आहे. या प्रबंधासाठी व्हीएसपीएमचे व्यवस्थापन, अधिष्ठाता डॉ. उषा रडके, उपअधिष्ठाता डॉ. एस. आर. शेणॉय यांचे अभ्यासकांनी सहकार्यासाठी आभार मानले आहेत.

(संपादन : प्रशांत राॅय) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com