नागपूरकरांनो! शनिवारपासून कोविड लसीकरण, 'या'ठिकाणी मिळेल लस

राजेश प्रायकर
Tuesday, 12 January 2021

शहरात जवळपास २४ हजारांवर तर ग्रामीण भागात सुमारे अकरा हजारांवर शासकीय व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.

नागपूर : शहरात महापालिका तर ग्रामीणमध्ये जिल्हा प्रशासनाने कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण केली असून येत्या १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील २३ केंद्रावरून लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 'कोव्हिन' अ‌ॅपवर नोंदणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेच लसीकरण करण्यात येणार असून एका केंद्रावर १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

कोविड लसीकरणासंदर्भात सोमवारी महापालिकेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली. शहरात जवळपास २४ हजारांवर तर ग्रामीण भागात सुमारे अकरा हजारांवर शासकीय व खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांची कोविड पोर्टलवर नोंदही झाली आहे. शहरी भागात लसीच्या साठवणुकीसाठी ४८, तर ग्रामीण भागामध्ये ६८ 'कोल्ड चेन पॉईन्ट्स'ची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर सुरक्षेच्या सर्व कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचारी व पोलिस कर्मचारी तैनात राहतील. प्रत्येक झोनस्तरावर झोनल वैद्यकीय अधिकारी लसीकरणाचे समन्वय करतील, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. मनपातील बैठकीत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक थेटे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अंकिताने सांगितले होते आरोपीचे नाव; पहिल्या दिवशी नोंदविली तिघांची साक्ष

येथे मिळणार लस - 
शहर : सदर रोगनिदान केंद्र, महाल रोगनिदान केंद्र, पाचपावली सूतिकागृह, केटीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल. 

ग्रामीण : कळमेश्वर, मौदा, भिवापूर, उमरेड, काटोल, नरखेड, पारशिवनी, हिंगणा, कुही, रामटेक व कामठीतील उप जिल्हा रुग्णालये, सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण संस्था व नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोरखेडी तसेच कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीतील प्राथमिक आरोग्य केंद्र. 

हेही वाचा - नागरिकांनो! ऐन संक्रांतीत घरात साचणार कचरा, पाच झोनमध्ये वाढणार डोकेदुखी

पहिल्या टप्प्यातील आरोग्यसेवक -

  • शहर - २४ हजारांवर 
  • ग्रामीण - ११ हजारांवर 

कोल्ड चेन पॉइंट्स (लस साठवणूक केंद्र) -

  • शहर - ४८ 
  • ग्रामीण - ६८ 

लसीकरण ऐच्छिक, निःशुल्क - 
लस घेण्याचे कुणावरही बंधन नाही. ती ऐच्छिक असून निःशुल्क आहे. सध्या शहरात ८ लसीकरण केंद्र असून ती ५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय रुग्णालय, मनपाच्या आरोग्य केंद्रांसह खाजगी रुग्णालयांचाही समावेश राहणार आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या २४ तासापूर्वी  'एसएमएस'वरून केंद्राची माहिती, वेळ आदी कळविले जाईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid vaccination will starts from saturday in nagpur