नागरिकांनो! ऐन संक्रांतीत घरात साचणार कचरा, पाच झोनमध्ये वाढणार डोकेदुखी

राजेश प्रायकर
Tuesday, 12 January 2021

महापालिकेने घराघरांतून कचरा उचलण्याचे कंत्राट एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपन्यांना दिले आहे. दोन्ही कंपन्यांकडे प्रत्येकी पाच झोनमधील कचरा उचलण्याची जबाबदारी आहे.

नागपूर : शहरातील पाच झोनमधील कचऱ्याची उचल करणारे एजी एन्व्हायरो कंपनीचे कर्मचारी संपावर जाणार आहे. कंपनीकडून ईएसआयच्या पैशाचा भरणा केला नसल्याने आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांत संताप असून संविधान चौकात आंदोलनही केले जाणार आहे. 

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अंकिताने सांगितले होते आरोपीचे नाव; पहिल्या दिवशी नोंदविली...

महापालिकेने घराघरांतून कचरा उचलण्याचे कंत्राट एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपन्यांना दिले आहे. दोन्ही कंपन्यांकडे प्रत्येकी पाच झोनमधील कचरा उचलण्याची जबाबदारी आहे. एजी एन्व्हायरो कंपनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर झोनमधील घरांतून कचऱ्याची उचल करीत आहे. यासाठी १०८० कर्मचाऱ्यांची फौज आहे. हे सर्व कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे उद्यापासून घराघरांत कचरा साचणार असल्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान, आज लक्ष्‍मीनगर, धरमपेठ व धंतोली झोनमध्ये कर्मचाऱ्यांनी आजही कचऱ्याची उचल केली नाही. कंपनीने लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कारण पुढे करीत १४० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यानंतर कंपनीत संतापाची लाट पसरली. यातील काही लोकांना कामावर परत घेण्याबाबत अनेकदा चर्चा केली. परंतु, कंपनी व्यवस्थापकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने संपाचे हत्यार उगारावे लागले, असे नागपूर जिल्हा मनपा, नपा, नपं. कंत्राटी कामगार संघटननेचे अध्यक्ष युगल विदावत यांनी नमुद केले. कंपनीला संपाबाबत १७ डिसेंबरला संघटनेकडून नोटीस देण्यात आली होती. 

हेही वाचा - वाघ मालकाला नेत होता ओढत, पण कुत्र्यानं केलेलं कृत्य पाहून मृत्यूच्या दारात असलेला मालकही झाला...

कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर भरती - 
एकीकडे कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आता नव्याने भरती घेण्यात येत असल्याचे समजते. यापूर्वी कंपनीत लागलेल्या कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी पैसे घेण्यात आले. आता नव्याने भरती करून पैसे घेण्याचे कंपनीचे मनसुबे दिसत असल्याचा आरोपही विदावत यांनी केला. 

आयुक्तांकडे केली तक्रार -
कंपनीच्या धोरणाविरुद्ध तसेच ईएसआयचे पैसे न भरल्याबाबत आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे संघटनेने तक्रार केली. सुट्या, ईएसआयच्या मुद्द्यांवर कंपनीसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे विदावत यांनी सांगितले. 

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

कंपनी अधिकाऱ्यांनी फेटाळले आरोप -
प्रत्येक कर्मचाऱ्यांचा ईएसआय तसेच पीएफ भरण्यात येते. यासंबंधी महापालिकेकडे दर महिन्याला कागदपत्र सादर केली जाते. एवढेच नव्हे सॅनिटायझर, मास्क, गमबूट' आदीही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक समीर टोनते व जनसंपर्क अधिकारी शशांक चौबे यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ag company employees strike in nagpur